अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. File photo.
आंतरराष्ट्रीय

DONALD TRUMP |युद्धात मदतीस नकार अन् ट्रम्प यांचा वार..! थेट फ्रान्सच्या फर्स्ट लेडींचे 'घरगुती' भांडणच आणले चव्हाट्यावर

TRUMP VS MACRON | मॅक्रॉन यांच्यावर वैयक्तिक टीका; पत्नीबद्दलही केली वादग्रस्त टिप्पणी

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump Personal Attack Macron

वॉशिंग्टन : इराणमधील युद्धात अमेरिकेला मदत न केलेल्‍या मित्र राष्‍ट्रांविरोधात अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प चांगलेच भडकले आहेत. त्‍यांनी आता फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर वैयक्तिक टीका केली आहे. ट्रम्प यांनी मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांची जाहीर थट्टा उडवली आहे.

पत्नी त्यांच्याशी अत्यंत वाईट वागते...

एका लंच दरम्यान बोलताना ट्रम्प यांनी फ्रान्‍सचे राष्‍ट्राध्‍यक्ष मॅक्रॉन यांच्यावर निशाणा साधला. ते म्‍हणाले "मी मॅक्रॉन यांना फोन केला. त्यांच्या पत्नी त्यांच्याशी अत्यंत वाईट वागते," असे म्हणत ट्रम्प यांनी मे २०२५ मधील एका व्हिडिओचा संदर्भ दिला. या व्हिडिओमध्ये व्हिएतनाम दौऱ्यादरम्यान ब्रिगिट मॅक्रॉन यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा चेहरा ढकलल्याचे दिसत होते. या क्लिपला मॅक्रॉन यांनी यापूर्वीच 'डिस्इन्फॉर्मेशन' (चुकीची माहिती) म्हणून फेटाळून लावले होते. याच घटनेचा उल्लेख करत ट्रम्प यांनी, "ते अजूनही जबड्यावर मारलेल्या फटक्यातून सावरत आहेत," असे उपरोधिक विधान केले.

ट्रम्‍प यांचा व्‍हिडिओ नंतर हटवला

ट्रम्‍य यांनी मॅक्रॉन यांच्‍याबाबत केलेल्‍या वादग्रस्‍त विधानाचा व्‍हिडिओ व्हाईट हाऊसच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरपोस्ट करण्यात आला होता, मात्र नंतर तो काढून टाकण्यात आला.

मॅक्रॉन यांनी नाकारली ट्रम्‍प यांना मदत

इराण युद्धात मदतीबाबत ट्रम्प म्हणाले की, "आम्ही खाडी देशांत (गल्फ) कारवाई करत असताना फ्रान्सला मदत मागितली होती. मी त्यांना विचारले होते, तुम्ही आम्हाला तात्काळ जहाजे पाठवून मदत करू शकता का?" यावर मॅक्रॉन यांनी, "नाही डोनाल्ड, आम्ही युद्ध जिंकल्यानंतरच हे करू शकतो," असे उत्तर दिले. यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना, "युद्ध जिंकल्यानंतर मला मदतीची गरज नाही," असे स्पष्ट केले.

नाटो (NATO) वरही साधला निशाणा

यावेळी ट्रम्प यांनी नाटो आघाडीवरही टीका करत तिला कागदी वाघ असे संबोधले. "जर कधी मोठे युद्ध झाले, तर नाटो आपल्या मदतीला नसेल," असा इशारा त्यांनी दिला. ट्रम्प यांच्या या भूमिकेला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनीही दुजोरा दिला आहे. "इराण युद्ध संपल्यानंतर आम्हाला नाटोच्या उपयुक्ततेचा फेरविचार करावा लागेल," असे रुबिओ यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना स्पष्ट केले आहे.

फ्रान्सची स्पष्ट भूमिका

दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणविरुद्ध सुरू केलेल्या लष्करी मोहिमेत फ्रान्सचा कोणताही सहभाग नाही, तसेच या निर्णयाबाबत फ्रान्सशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जपानी माध्यमांशी बोलताना दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT