Trump - Nicolas Maduro  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Nicolas Maduro bounty | व्हेनेझुएलाचे हुकुमशहा निकोलस मादुरो यांच्या अटकेसाठी ट्रम्प प्रशासनाकडून 416 कोटींचे बक्षीस जाहीर

Nicolas Maduro bounty | अमेरिकेचा मादुरोविरोधात पुन्हा हल्लाबोल; ड्रग तस्करीप्रकरणी मादुरो अडचणीत

Akshay Nirmale

Venezuelan President Nicolas Maduro Trump Administration $50 Million Bounty

न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष हुकूमशहा निकोलस मादुरो यांच्याविरोधात कठोर पावले उचलत, त्याच्या अटकेसाठी तब्बल 50 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 416कोटी रुपये) बक्षिसाची घोषणा केली आहे. हे बक्षीस मादुरोला अटक होईल अशी माहिती देणाऱ्याला दिले जाणार आहे.

मादुरोवर काय आरोप आहेत?

2020 साली न्यूयॉर्कमधील Southern District Court मध्ये निकोलस मादुरो याच्यावर नार्को-टेररिझम, कोकेन आयात कट रचणे, स्वयंचलित शस्त्रास्त्रे आणि विध्वंसक उपकरणांचे बेकायदेशीर धारक असल्याचे आरोप लावण्यात आले होते. हे आरोप अमेरिकेच्या न्याय विभागाने केले होते.

त्यावेळी ट्रम्प प्रशासनाने 15 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर बायडन प्रशासनाने जानेवारी 2025 मध्ये ते 25 दशलक्षपर्यंत वाढवले. आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ते दुप्पट करत 50 दशलक्ष डॉलर्स पर्यंत नेले आहे.

अमेरिकन अ‍ॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी काय म्हटले?

एका व्हिडीओ संदेशात अ‍ॅटर्नी जनरल पाम बॉन्डी यांनी सांगितले की- "मादुरो यांनी विदेशी दहशतवादी संघटनांसोबत हातमिळवणी केली आहे – Tren de Aragua, Sinaloa आणि Cartel of the Suns – हे सर्व गट अमेरिका आणि जगभरात अमली पदार्थ आणि हिंसाचार पसरवत आहेत."

त्यांनी असेही सांगितले की, DEA (Drug Enforcement Administration) ने आतापर्यंत मादुरो यांच्याशी संबंधित 30 टन कोकेन जप्त केले आहे, त्यातले 7 टन कोकेन थेट मादुरो यांच्याशी जोडले गेले आहे.

हे कोकेन अनेकदा फेंटेनिल या अत्यंत घातक अमली पदार्थाने मिसळलेले असते, ज्यामुळे अमेरिका आणि जगभरात हजारो लोकांचे जीव गेले आहेत.

काय जप्त करण्यात आले आहे?

अमेरिकन न्याय विभागाने आतापर्यंत मादुरोशी संबंधित 700 दशलक्ष डॉलर्सहून अधिक संपत्ती, 2 खाजगी जेट विमाने, 9 वाहने इतर अनेक मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका

मादुरो यांचा सत्ताकाल "भीती, हिंसा आणि अमली पदार्थांच्या साम्राज्याने ग्रस्त" असल्याचे बॉन्डी यांनी सांगितले. बॉन्डी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "निकोलस मादुरो हा जगातील सर्वात मोठ्या अमली पदार्थ तस्करांपैकी एक आहे. तो आमच्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी थेट धोका आहे."

राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिणाम

ही कारवाई अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर आणि व्हेनेझुएला-अमेरिका संबंधांवर मोठा परिणाम करू शकते. व्हेनेझुएलाच्या सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवणाऱ्या जागतिक संघटनांना यामुळे नव्याने हस्तक्षेप करावा लागण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT