अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  Pudhari.
आंतरराष्ट्रीय

US Iran War | ट्रम्प पुन्हा 'वॉर मोड'मध्ये..! इराणवर आधीपेक्षाही मोठ्या हल्ल्याची तयारी; विमानांची उड्डाणे सुरू

अमेरिकेच्या हवाई दलाची ११ 'सी-१७ए' विमाने मध्य आशियातून युरोपच्या दिशेने रवाना

पुढारी वृत्तसेवा

US prepares for a massive strike on Iran

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, अमेरिका इराणवर २८ फेब्रुवारीपेक्षाही मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या हवाई दलाची ११ 'सी-१७ए' (C-17A) विमाने मध्य आशियातून युरोपच्या दिशेने रवाना झाली आहेत. २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्यापूर्वीही अशाच प्रकारच्या हालचाली पाहायला मिळाल्या होत्या. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटच्या क्षणी इराणवरील मोठा हल्ला रद्द केल्याचे सांगण्यात आले होते.

पेंटागॉनचे अनेक योजनांवर काम सुरु

'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तानुसार, अमेरिका आणि इस्रायल पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर लष्करी तयारी करत असल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांनीही स्पष्ट केले होते की, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे मुख्य कार्यालय पेंटागॉनकडे अनेक योजना तयार आहेत, ज्यामध्ये गरज पडल्यास युद्ध सुरू करण्याचाही समावेश आहे. याशिवाय, परिस्थितीनुसार सैन्याची संख्या कमी करणे किंवा त्यांना परत बोलवण्याचा पर्यायही खुला आहे.

युरेनियमच्या साठ्यावर होऊ शकतो हल्ला

न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला, तर यावेळेस लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाईल. यासोबतच, इराणच्या संभाव्य युरेनियम साठ्यालाही टार्गेट केले जाऊ शकते. अमेरिकेसोबत झालेल्या १२ दिवसांच्या युद्धादरम्यान इराणचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त झाले होते. इराणचे युरेनियमचे साठे जमिनीखाली गाडले गेले होते, अशी माहिती समोर येत आहे.

ट्रम्‍प यांनी चीनमधून रवाना होण्‍यापूर्वी केले होते सूचक विधान

डोनाल्ड ट्रम्प आणि शी जिनपिंग यांच्यातील भेटीनंतरही या युद्धाबाबत कोणताही ठोस निष्कर्ष निघू शकलेला नाही. मंगळवारी चीनमधून रवाना होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली. "जर इराणने करार केला नाही, तर त्यांचा विनाश केला जाईल," असे ट्रम्प म्हणाले. तसेच, इराणसोबतचा युद्धविराम अत्यंत नाजूक टप्प्यावर असून कधीही पुन्हा हल्ला करावा लागू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.

चोख प्रत्युत्तर देण्यास तयार : इराणची स्‍पष्‍टोक्‍ती

अमेरिकेने इराणवर हल्ला केला, तर दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा भीषण युद्ध पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबाफ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, "अमेरिकेच्या प्रत्येक कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल. चुकीच्या निर्णयांचे परिणामही चुकीचेच होतात."

पाकिस्‍तानचे गृहमंत्री इराण दौर्‍यावर

दुसरीकडे, पाकिस्तानचे गृहमंत्रीही इराण दौऱ्यावर पोहोचले आहेत. ते इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे समजते. पाकिस्तान सुरुवातीपासूनच इराण आणि अमेरिका यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानच्या प्रयत्नांनंतर इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती, परंतु त्यातून कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. अमेरिका आणि इराणमधील मतभेद मिटू शकले नसल्याने, दोन्ही देशांमधील दुसऱ्या फेरीची चर्चा होऊ शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT