Tejas Fighter Jet Crash: आज शुक्रवारी (21 नोव्हेंबर 2025) दुबई एअर शोमध्ये प्रात्यक्षिक सुरू असताना भारतीय तेजस लढाऊ विमान कोसळले. पायलट बाहेर पडला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की आकाशात असताना, तेजस विमान अचानक जमिनीवर आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला.
ही घटना स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:10 वाजता घडली, जेव्हा हजारो प्रेक्षक विमानाचे एरोबॅटिक्स पाहत होते. हवेत फिरत असताना, पायलटचा अचानक तेजस लढाऊ विमानावरील ताबा सुटला आणि विमान जमिनीवर कोसळले. या अपघातानंतर, दुबई एअर शो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
दुबई एअर शो हा जगातील महत्त्वाचा एव्हिएशन आणि डिफेन्स शो समजला जातो. येथे जगभरातील सुप्रसिद्ध एयरोस्पेस कंपन्या, एअरलाईन्स, विविध देशांच्या वायुसेना आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपन्या आपले नवीन विमान, हेलिकॉप्टर आणि एव्हिएशन तंत्रज्ञानाचा शो करतात.
या वर्षीचा दुबई एअर शो पाच दिवसांचा होता आणि शुक्रवारी त्याचा शेवटचा दिवस होता. 1989 पासून दर दोन वर्षांनी दुबईतील अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे प्रदर्शन आयोजित केले जाते. विशेष म्हणजे, भारतीय तेजस लढाऊ विमान तिसऱ्यांदा या शोमध्ये सहभागी झाले होते. तेजस हे भारताने स्वतः विकसित केलेले लाइट कॉम्बॅट विमान असून त्याची किंमत अंदाजे ₹600 कोटी आहे.
दरम्यान, डेमो फ्लाईटदरम्यान तेजस कोसळण्याची घटना घडताच काही मिनिटांतच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. दुपारच्या सत्रात प्रेक्षकांची सर्वाधिक उपस्थिती असल्याने सावधगिरी म्हणून संपूर्ण एअर शो काही काळासाठी थांबवण्यात आला. अपघातानंतर सुरक्षेच्या दृष्टीने उपस्थित सर्वांना प्रदर्शन क्षेत्राबाहेर हलवण्यात आले असून, अपघाताचे कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.