नाशिक : नाशिकच्या एचएएल प्रकल्पात निर्मित 'एलसीए एमके-१ए अर्थात तेजस' या लढाऊ जेटने आकाशात झेप घेत भारताचे हवाई सामर्थ्य जगाला दाखवून दिले. सुपरसॉनिक लढाऊ विमानांच्या श्रेणीत येत असलेल्या या जेटची लढाऊ क्षमता शत्रू राष्ट्राला धडकी भरविणारी असून, २०३४ पर्यंत नाशिकच्या प्रकल्पातून तब्बल ९७ तेजसचा ताफा हवाई दलात दाखल होवून देशाचे हवाई सामर्थ्याला मजबुतीचे पंख देणार आहेत.
पूर्णत: भारतीय बनावटीचे असलेल्या तेजसची सध्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलच्या बेंगळुरू आणि नाशिक येथील प्रकल्पात निर्मिती केली जात आहे. तेजसच्या निर्मितीसाठी बेंगळुरू येथील प्रकल्पात दोन तर नाशिक येथील प्रकल्पात तिसरी लाइन काही दिवसांपूर्वीच कार्यरत करण्यात आली आहे. बेंगळुरू येथील पहिल्या राष्ट्रीय लाइनसाठी १३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली होती.
दुसरी लाइन सुमारे ४८० ते ५०० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आली. या दोन्ही लाइनच्या माध्यमातून वर्षाकाठी १६ तेजस निर्मितीचे लक्ष आहे. तर नाशिक येथील एचएएल प्रकल्पात देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या तिसऱ्या राष्ट्रीय लाइनसाठी तब्बल ५०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, याठिकाणी वर्षाकाठी तब्बल १० तेजसच्या बांधणीचे उद्दिष्टे आहे. पुढच्या काही वर्षात यातही बदल करून उद्दिष्टे वाढविले जाणार आहेत.
२०३४ पर्यंत नाशिकच्या एचएएल प्रकल्पातून तब्बल ९७ तेजस हवाई दलाला दिले जाण्याचे उद्दिष्टे असून, त्यादृष्टीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. राफेलच्या तुलनेत हलके वजन, उंच उडण्याची क्षमता आणि शस्त्र वाहून नेण्याच्या नुलतेनही इतर जेटपेक्षा सरस असलेले तेजस आगामी काळात देशाच्या हवाई दलाचे नेतृत्व करण्याची क्षमता ठेवणारे जेट आहे. पूर्णत: भारतीय बनावटीचे हे जेट इतर देशांना आकर्षित करणारे असून, तेजसमुळे भारताचा संरक्षण उत्पादन निर्यातीतही दबदबा वाढत आहे.
२०२९ पर्यंत ८३ तेजस
नाशिक आणि बेंगळुरू येथील तिन्ही उत्पादन साखळ्यांमधून २०२९ पर्यंत ८३ तेजस भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहेत. बेंगळुरू येथील एचएएलमध्ये पहिली उत्पादन साखळी २०१७-१८ मध्ये उभारण्यात आली. दुसरी उत्पादन साखळी २०२० मध्ये उभारण्यात आली आहेत. तर नाशिक एचएएलमध्ये तिसरी उत्पादन साखळी २०२५ मध्ये उभारण्यात आली आहे. या तिन्ही उत्पादन साखळ्यांमधून २०२९ पर्यंत ८३ तेजस निर्मितीचे लक्ष आहे.
आतापर्यंत २३०० कोटींची गुंतवणूक
बेंगळुरू येथील दोन उत्पादन लाइनसाठी १८०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून, या उत्पादन साखळ्यांच्या माध्यमातून वर्षाकाठी १४ तेजस निर्मितीचे लक्ष आहे. तर नाशिकमध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या लाइनसाठी ५०० कोटींची गुंतवणूक केली असून, याठिकाणी वर्षाकाठी ८ तेजस निर्मितीचे लक्ष आहे. पुढे वाढवून ते १० पर्यंत नेण्याचे उद्दिष्टे असून, आतापर्यंत २३०० कोटींची गुंतवणूक केली गेली आहे.