

Karisma Kapoor Daughter Fees: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर यांची मुलगी समायरा कपूर सध्या वडिलांच्या मालमत्तेविषयी सुरु असलेल्या न्यायालयीन वादामुळे चर्चेत आहे. दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्यूपत्रावर समायरा आणि तिच्या भावाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी संजय यांनी केलेले मृत्यूपत्र चुकीचे असल्याचा दावा करीत प्रिया सचदेव कपूर यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
अलीकडील सुनावणीत समायराने असा आरोप केला होता की तिची दोन महिन्यांची विद्यापीठाची फी भरली नाही. या आरोपावर न्यायालयाने दोन्ही पक्षांना “अशा नाट्यमय आरोपांपासून दूर राहा” असा सल्ला दिला होता. त्यानंतर प्रिया कपूर यांच्या वकिलांनी समायराची फी भरल्याचे पुरावे कोर्टात सादर केले आहेत.
प्रिया यांचे वकील शैल त्रेहन यांनी दाखवून दिलेल्या कागदपत्रांनुसार समायराच्या एका सेमिस्टरची फी तब्बल ₹95 लाख रुपये आहे. त्यांचे म्हणणे आहे की पहिला हप्ता जमा केला गेला असून डिसेंबर महिन्यात पुढील सेमिस्टरचा हप्ता जमा केला जाणार आहे.
समायरा कपूरने शालेय शिक्षण अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे मधून घेतले आहे. सध्या ती अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स राज्यातील टफ्ट्स युनिव्हर्सिटीत पदवीचे शिक्षण घेत आहे. समायरा सोशल मीडिया पासून दूर राहणे पसंत करते आणि तिचे सोशल मीडिया अकाउंटसुद्धा खाजगी आहे.
न्यायालयीन सुनावणीत प्रिया कपूर यांनी सांगितले की पतीची संपूर्ण मालमत्ता पत्नीच्या नावावर लिहिणे ही त्यांच्या कुटुंबातील परंपरा आहे. संजय कपूर यांच्या वडिलांनीही आपली सर्व मालमत्ता पत्नी राणी कपूर यांच्या नावावर केली होती. त्यामुळे संजय यांच्या मृत्यूपत्रात काहीही संशयास्पद नाही, असा त्यांचा दावा आहे.