Andrew Tate, Tristan Tate file photo
आंतरराष्ट्रीय

Tate brothers arrested: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर टेट बंधूंना अटक; बलात्कार, लैंगिक तस्करीसह गंभीर आरोप

सोशल मीडियावरील वादग्रस्त इन्फ्लुएन्सर अँड्र्यू टेट आणि ट्रिस्टन टेट या बंधूंना अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी येथे रविवारी अटक करण्यात आली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Tate brothers arrested

मियामी: सोशल मीडियावरील वादग्रस्त इन्फ्लुएन्सर अँड्र्यू टेट आणि ट्रिस्टन टेट या बंधूंना अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील मियामी येथे रविवारी अटक करण्यात आली आहे. यानंतर ब्रिटन सरकारने त्यांच्याविरुद्ध बलात्कार, लैंगिक तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांप्रकरणी प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली आहे. दोघांकडेही अमेरिकन आणि ब्रिटिश असे दुहेरी नागरिकत्व आहे.

ब्रिटनच्या क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसने रविवारी जाहीर केले की, ३९ वर्षीय अँड्र्यू टेटविरुद्ध सात बलात्कार, तीन लैंगिक तस्करी, तीन मारहाणीचे गुन्हे तसेच अल्पवयीनांच्या अश्लील प्रतिमा आणि अत्यंत अश्लील साहित्याशी संबंधित १९ अतिरिक्त आरोप दाखल करण्यात येणार आहेत. तर त्याचा भाऊ ३८ वर्षीय ट्रिस्टन टेटवर एका लैंगिक अत्याचाराचा, दोन बलात्कारांच्या आणि लैंगिक शोषणासाठी मानवी तस्करीची व्यवस्था केल्याच्या किंवा त्यास मदत केल्याच्या तीन आरोपांचा समावेश आहे.

यापूर्वीही टेट बंधूंवर ब्रिटनमध्ये बलात्कार, मानवी तस्करी आणि शारीरिक दुखापत यांसह एकूण २१ गुन्ह्यांमध्ये खटले सुरू आहेत. हे आरोप तीन पीडितांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते.

टेट बंधूंचे वकील जोसेफ मॅकब्राइड यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, "सक्षम न्यायाधीशांसमोर सर्व तथ्ये मांडल्यानंतर आणि न्याय विभागाने आपल्या अधिकारांचा झालेला गैरवापर लक्षात घेतल्यानंतर अँड्र्यू आणि ट्रिस्टन यांची निर्दोष मुक्तता होईल," असा विश्वास व्यक्त केला आहे.

सीपीएसच्या माहितीनुसार, नव्या आरोपांमुळे या प्रकरणातील कथित पीडितांची संख्या आता सात झाली आहे. संबंधित घटना जुलै २०१० ते ऑगस्ट २०१७ या कालावधीत घडल्याचा आरोप आहे.

रोमानियातही झाली होती अटक

टेट बंधूंना २०२२ मध्ये रोमानियात अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेथून बाहेर पडल्याचे सांगितले जाते. रोमानियामध्येही त्यांच्याविरुद्ध बलात्कार आणि मानवी तस्करीसह स्वतंत्र गुन्ह्यांची सुनावणी सुरू असून, या प्रकरणांचा ब्रिटनमधील आरोपांशी थेट संबंध नाही.

वादग्रस्त प्रतिमेमुळे चर्चेत

अँड्र्यू आणि ट्रिस्टन टेट यांनी सोशल मीडियावर आपल्या आलिशान जीवनशैलीचे प्रदर्शन करत मोठी लोकप्रियता मिळवली. मात्र महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे त्यांच्यावर सातत्याने टीका होत राहिली. कायदेशीर अडचणी सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रतिमा वादग्रस्त बनली होती. तरीही अमेरिकेसह अनेक देशांमध्ये त्यांचे मोठे फॉलोअर्स आहेत. २०२५ मध्ये अमेरिकेच्या सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची जप्ती केल्यानंतर व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने त्यांच्या संरक्षणासाठी हस्तक्षेप केल्याचा दावा माध्यमांमध्ये करण्यात आला होता. दरम्यान, अँड्र्यू आणि ट्रिस्टन टेट यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT