

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासात पाकिस्तानने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. यंदा प्रथमच पाकिस्तान मिस वर्ल्ड स्पर्धेत अधिकृतपणे सहभागी होणार असून, २४ वर्षीय अनीका जमाल इक्बाल हिची 'मिस वर्ल्ड पाकिस्तान २०२६' म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मिस वर्ल्ड स्पर्धेच्या ७३ वर्षांच्या इतिहासात पाकिस्तानचे अधिकृत प्रतिनिधित्व करणारी ती पहिली स्पर्धक ठरणार आहे.
सध्या अनीका अकाऊंटिंग आणि ऑडिटिंग या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. सौंदर्यस्पर्धांचा तिला चांगलाच अनुभव असून यापूर्वी तिने मिस अर्थ, मिस ग्लोबल, मिस कॉस्मो, मिस इको इंटरनॅशनल आणि मिस ऑरा इंटरनॅशनल यांसारख्या अनेक प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे. मिस पाकिस्तान वर्ल्ड संस्थेच्या अध्यक्षा सोनिया अहमद यांनी या निवडीला पाकिस्तानसाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.