Dr. Bhimrao Ambedkar Award pudhari
आंतरराष्ट्रीय

Dr. Bhimrao Ambedkar Award: अमेरिकेत पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे जागतिक पुरस्काराची घोषणा

Anirudha Sankpal

Ambedkar Jayanti 2026 Dr. Bhimrao Ambedkar Award America: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संपूर्ण जगभरात उत्साहाचे वातावरण असतानाच, अमेरिकेतून एक ऐतिहासिक घोषणा करण्यात आली आहे. 'सोसायटी फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ अमेरिकन फिलॉसफी' (SAAP) या अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित संस्थेने जागतिक व्यवहारवाद (Global Pragmatism) या विषयातील संशोधनासाठी 'भीमराव आंबेडकर पुरस्कार' स्थापन केला आहे. अमेरिकेतील एखाद्या शैक्षणिक किंवा तात्विक संस्थेने बाबासाहेबांच्या सन्मानार्थ असा पुरस्कार सुरू करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुरस्काराचे महत्त्व आणि उद्दिष्ट

या पुरस्काराच्या घोषणेमुळे बाबासाहेबांच्या जागतिक विचारधारेवर शिक्कामोर्तब झाले आहे. अमेरिकन विचारवंतांचा जगातील विविध परंपरांशी असलेला संवाद अधोरेखित करणे आणि व्यवहारवादाच्या क्षेत्रातील संशोधनाला प्रोत्साहन देणे, हे या पुरस्काराचे मुख्य उद्दिष्ट आहे. बाबासाहेबांच्या मानवतावादी आणि लोकशाहीवादी विचारांची दखल आता जागतिक स्तरावरील तत्वज्ञ घेत असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

चैत्यभूमीवर भीमसागर; वाहतुकीत मोठे बदल

दरम्यान, मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो अनुयायांची गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दादर परिसरात वाहतुकीचे कडक निर्बंध लागू केले आहेत. आज मध्यरात्रीपर्यंत सिद्धिविनायक मंदिर ते येस बँक जंक्शन हा मार्ग पूर्णपणे बंद असेल. ज्ञानेश्वर मंदिर मार्ग आणि रानडे रोडवरही निर्बंध असून, एस. के. बोले रोडवर एकमार्गी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

पुण्यात अवजड वाहनांना बंदी

पुणे शहरातही भीमजयंतीचा मोठा उत्साह असून खबरदारीचा उपाय म्हणून शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना २४ तासांसाठी बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहनांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पुणे पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वाशिममध्ये १० तासांच्या मेहनतीतून साकारली रांगोळी

वाशिममध्ये शिक्षक सचिन दामोदर यांनी आपल्या कलेतून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना दिली आहे. त्यांनी तब्बल १० तास मेहनत घेऊन बाबासाहेबांचे हुबेहूब चित्र रांगोळीतून साकारले आहे. विहारात वंदनासाठी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष ही रांगोळी वेधून घेत असून, सोशल मीडियावरही या कलाकृतीचे कौतुक होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT