Sheikh Hasina return to Bangladesh : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे बांगलादेश सरकारने स्वागत केले आहे. मात्र, स्वागत करतानाच शेख हसीना यांना एक सूचक सल्लाही दिला आहे. बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे सल्लागार झाहिद उर रहमान यांनी म्हटले आहे की, हसीना यांनी परतताना जगातील सर्वोत्तम वकील आपल्यासोबत घेऊन यावे. कारण, मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या दोषीच्या रूपात हसीना यांना कायदेशीर आणि न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.
बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या कन्या शेख हसीना (७८) यांनी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीव्र आणि हिंसक आंदोलनानंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी देश सोडला आणि त्या भारतात आल्या. तेव्हापासून त्या भारतातच वास्तव्य करत आहेत.
बांगलादेशच्या पंतप्रधानांचे माहिती आणि धोरणात्मक बाबींचे सल्लागार झाहिद उर रहमान यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, "आम्ही हसीना यांच्या घोषणेचे स्वागत करतो, कारण आम्हाला न्याय सुनिश्चित करायचा आहे.देशातील जनतेची इच्छा आहे की हसीना यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली जावी. जनतेची हीच मागणी लक्षात घेता, त्यांच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाईल.
"हसीना यांना जगातील सर्वात चांगला वकील आणू द्या." आंतरराष्ट्रीय गुन्हे लवाद-बांगलादेश (ICT-BD) ची संपूर्ण कार्यवाही अत्यंत पारदर्शक पद्धतीने चालवली जाईल, ज्यावर आंतरराष्ट्रीय निरीक्षक लक्ष ठेवू शकतील आणि याचे थेट प्रक्षेपणही केले जाऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
न्यायालय हसीना यांच्याविरोधातील निर्णयावर पुनर्विचार करू शकते किंवा त्यांना निर्दोष मुक्तही करू शकते, अशी शक्यताही रहमान यांनी व्यक्त केली. हसीना यांच्या प्रस्तावित वापसीमुळे सरकार कोणत्याही दबावाखाली नाही. यापूर्वी २०१० मध्ये अवामी लीगच्या कार्यकाळात स्थापन झालेल्या आयसीटी-बीडी (ICT-BD) च्या निर्णयांना स्थगिती देण्याचे किंवा ते रद्द करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. प्रक्रियात्मक मुद्दे हसीना यांच्या वापसीमध्ये अडथळा ठरणार नाहीत आणि भारत या प्रकरणी बांगलादेशशी चर्चा करून आवश्यक ती व्यवस्था करू शकतो, असे रहमान म्हणाले.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ढाका येथील एका विशेष लवादाने विद्यार्थी आंदोलनाविरुद्ध तत्कालीन हसीना सरकारने केलेल्या दडपशाहीला 'मानवतेविरुद्धचा गुन्हे' मानले होते. या प्रकरणी शेख हसीना यांच्या अनुपस्थितीत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान, शेख हसीना यांनी स्वतःला सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा, गुन्हेगारी दोषसिद्धी आणि सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. या निकालानंतर, शेख हसीना यांनी कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे यासाठी बांगलादेश सातत्याने भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी करत आहे.