

India-Bangladesh Energy Cooperation
नवी दिल्ली/ढाका: पश्चिम आशियातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक ऊर्जा सुरक्षेवर संकट ओढवले असतानाच, भारताने बांगलादेशला मोठा दिलासा दिला आहे. द्विपक्षीय कराराचा भाग म्हणून भारताने 'भारत-बांगलादेश मैत्री पाइपलाइन'द्वारे (IBFP) ५,००० टन डिझेलचा पहिली खेप बांगलादेशला पाठवण्यास सुरुवात केली आहे. शेख हसीना यांच्या पदच्युतीनंतर दोन्ही देशांतील ऊर्जा संबंधांमध्ये आलेली कटुता दूर होऊन संबंध पुन्हा स्थिरावत असल्याचे हे लक्षण मानले जात आहे.
इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. याचा मोठा फटका बांगलादेशला बसला आहे. तिथे इंधनाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आसाममधील नुमालीगड रिफायनरीतून पाइपलाइनद्वारे डिझेल उपसण्यास सुरुवात झाली आहे. बांगलादेश पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे (BPC) अध्यक्ष मोहम्मद रेझानूर रहमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५,००० टन डिझेलची ही पहिली खेप मंगळवारी बांगलादेशातील दिनाजपूर येथील पर्बतीपूर डेपोमध्ये पोहोचणे अपेक्षित आहे.
वार्षिक १,८०,००० टन डिझेल पुरवठा करण्याचे दोन्ही देशांत उद्दिष्ट आहे.
येत्या सहा महिन्यांत किमान ९०,००० टन डिझेलचा पुरवठा केला जाईल.
मार्च २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी या पाइपलाइनचे उद्घाटन केले होते. रेल्वे टँकरच्या तुलनेत याद्वारे कमी खर्चात आणि वेगाने इंधन वहन करणे शक्य होते.
"भारतासोबतच्या करारानुसार दरवर्षी १,८०,००० टन डिझेल पाइपलाइनद्वारे मिळणार आहे.
सध्या येत असलेला ५,००० टनांचा साठा हा याच प्रक्रियेचा भाग आहे," असे बीपीसीचे अध्यक्ष रहमान यांनी स्पष्ट केले.
ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांचे सरकार कोसळल्यानंतर मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने भारतासोबतचे अनेक ऊर्जा करार वादाच्या भोवऱ्यात आणले होते. अदानी समूहाच्या झारखंडमधील प्रकल्पातून होणारा वीज पुरवठा आणि कोळसा पुरवठ्यावरही याचा परिणाम झाला होता. मात्र, ढाका येथे आता तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बीएनपी (BNP) सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध पुन्हा रुळावर येत असल्याचे चित्र आहे.
बांगलादेश आपल्या गरजेच्या ९५ टक्के इंधन आयातीवर अवलंबून आहे, ज्यातील मोठा वाटा मध्यपूर्वेतून येतो. पर्शियन आखातातील 'होरमुझची सामुद्रधुनी' युद्धामुळे प्रभावित झाल्याने बांगलादेशात इंधनाचे रेशनिंग सुरू झाले आहे. अनेक ठिकाणी दुचाकींसाठी १० लिटर आणि कारसाठी ४० लिटरची मर्यादा घालण्यात आली असून पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.