Saudi Arabia Houthi Mecca drone Threat
इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र स्थळ मानल्या जाणाऱ्या मक्का शहराच्या दिशेने हुथी बंडखोरांनी डागलेला एक ड्रोन सौदी आघाडीच्या सैन्याने हवेतच रोखून नष्ट केला आहे. या गंभीर घटनेमुळे पवित्र शहराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, दोन्ही देशांमधील संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, या युद्धावर पडदा पाडण्यासाठी चीनने मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. याच पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची हे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेण्यासाठी बीजिंगला रवाना झाले आहेत.
हुथी बंडखोरांच्या सततच्या ड्रोन हल्ल्यांनंतर सौदी अरेबियाने आपल्या 'यांबू' बंदरावरील तेलाचे लोडिंग तूर्तास थांबवले आहे. तथापि, सौदीचा पूर्व-पश्चिम पाईपलाईन मार्ग येत्या काही दिवसांत पुन्हा पूर्ववत सुरू होईल, अशी अपेक्षा अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राइट यांनी व्यक्त केली आहे.
हुथीच्या परराष्ट्र मंत्रालयाने या घडामोडींवर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'बाब अल-मंदिब' सामुद्रधुनीतील सागरी वाहतूक पूर्णपणे सुरक्षित आहे. सौदी अरेबिया या जलमार्गाबाबत आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही हुथी प्रशासनाने केला आहे. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित संस्थेने (UNHCR) दिलेल्या माहितीनुसार, येमेनच्या पश्चिम किनारपट्टीवर अचानक वाढलेल्या सशस्त्र संघर्षामुळे देशांतर्गत तब्बल १ लाखांपेक्षा जास्त नागरिक विस्थापित झाले आहेत. यामुळे हजारो लोकांना आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे.
इस्लाम धर्मातील दोन सर्वात पवित्र स्थळे आणि तेथे येणाऱ्या भाविकांची (जायरीन) सुरक्षा ही आमच्यासाठी ‘रेड लाईन’ असल्याचे सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीने बुधवारी स्पष्ट केले. येमेनमधील हुथी बंडखोरांनी मक्का शहराच्या दक्षिणेकडून डागलेला एक ड्रोन सौदीच्या हवाई संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केल्यानंतर हे विधान समोर आले आहे. सौदी आघाडीनुसार, मंगळवारी संध्याकाळी 'मक्का अल-मुकर्रमा'च्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वीच या ड्रोनला रोखण्यात आले.
आघाडीचे प्रवक्ते मेजर जनरल तुर्की अल-मलिकी यांनी या घटनेला 'शत्रुत्वपूर्ण आणि दहशतवादी कृत्य' म्हटले आहे. ड्रोन डागणाऱ्या संघटनेचा उल्लेख त्यांनी 'दहशतवादी हुथी मिलिशिया' असा केला. अल-मलिकी म्हणाले की, दोन पवित्र मशिदी आणि भाविकांची सुरक्षा ही आमची रेड लाईन आहे. हुथी चळवळीविरुद्ध आवश्यक आणि प्रतिबंधात्मक पावले उचलण्यास आघाडीची संयुक्त सैनिक कमान मागे हटणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. येमेनमधील सौदी आघाडी आणि हुथी बंडखोरांमधील लष्करी तणाव आणि आरोप-प्रत्यारोप वाढत असताना ही कारवाई झाली आहे.
मक्का शहराला लक्ष्य करण्याचा हा दुसरा प्रयत्न असल्याचे सौदी आघाडीने म्हटले आहे. यासाठी त्यांनी २७ जुलै २०१७ रोजी घडलेल्या घटनेचा संदर्भ दिला, ज्यामध्ये मक्काच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे सांगितले गेले होते. ताजी घटना भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी आणि तेथील नागरिकांना हानी पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली असल्याचे अल-मलिकी यांनी सांगितले.
दुसऱ्या बाजूला, हुथींचे लष्करी प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल याह्या सारी यांनी मंगळवारी टेलिग्रामवर निवेदन जारी करून सौदी अरेबियावर हल्ले केल्याचा आरोप केला. गेल्या २४ तासांत सौदीच्या युद्ध विमानांनी ५२ हवाई हल्ले केल्याचा दावा त्यांनी केला. त्यांच्या मते, या हल्ल्यांमध्ये 'F-15' आणि 'कायफून' लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला असून ती खमीस मुशैत आणि ताइफ एअरबेसवरून चालवली गेली. ताइज प्रांतातील शाळा, पूल आणि रस्ते यांसारख्या नागरी पायाभूत सुविधांना या हल्ल्यांत लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप सारी यांनी केला.
अल-जौफ, अल-बायदा, सादा आणि अमरान प्रांतातील इतर ठिकाणांवरही हल्ले झाल्याचा दावा हुथी प्रवक्त्याने केला आहे. मात्र, या दाव्यांना स्वतंत्र दुजोरा मिळालेला नाही. या क्रूर हल्ल्यांचे उत्तर दिल्याशिवाय सोडले जाणार नाही, असे हुथी प्रवक्त्याने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत हुथींनी येमेनमधील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवल्याने सौदी अरेबियाची चिंता वाढली आहे.
पश्चिम आशियातील युद्धाची झळ आता येमेन आणि सौदी-हुथी संघर्षापर्यंत पोहोचताना दिसत आहे. यामुळे धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या 'बाब-अल-मंदेब' सामुद्रधुनीबाबतची चिंता वाढली आहे. हुथी बंडखोरांनी या सागरी मार्गावरून जाणाऱ्या व्यापारी जहाजांनाही लक्ष्य केले आहे, ज्यामुळे बाब-अल-मंदेब स्ट्रेट हा प्रादेशिक तणावाचा केंद्रबिंदू बनला आहे. मक्काजवळ ड्रोन पाडल्यानंतर सौदी आघाडीने दिलेल्या ‘रेड लाईन’च्या इशार्यामुळे रियाध आणि हुथींमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता आहे.