सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यात बुधवारी रियाध येथे भेट झाली. यानंतर संरक्षण विषयक करार झाला.   Photo X
आंतरराष्ट्रीय

Pakistan-Saudi defense agreement : सौदी अरेबिया-पाकिस्‍तानमध्‍ये झाला संरक्षण करार! भारतासाठी किती धोकादायक?

दोन्ही देशांविरुद्ध आक्रमण हे दोघांविरुद्ध आक्रमकता मानले जाणार असल्‍याचे करारात नमूद

पुढारी वृत्तसेवा

Pakistan-Saudi Arabia defense agreement : सौदी अरेबियाने अण्वस्त्रधारी पाकिस्तानसोबत संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांविरुद्ध कोणतेही आक्रमण हे दोघांविरुद्ध आक्रमकता मानले जाईल, असे बुधवारी (दि. १७) संयुक्त निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जाणून घेऊया, पाकिस्तानबरोबर संघर्ष आणि सौदी अरेबियाबरोबर मैत्री असणाऱ्या आपल्या देशासाठी या कराराचा नेमका अर्थ काय? याविषयी जाणून घेऊया...

सौदी अरेबिया - पाकिस्तानमध्ये नेमका कोणता करार झाला?

पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये अनेक दशकांपासून अनौपचारिक संरक्षण संबंध आहेत. मात्र, नवीन करार इस्लामिक राष्ट्रांमधील सुरक्षा सहकार्याला औपचारिक रूप देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.१९६७ पासून पाकिस्तानने ८,२०० हून अधिक सौदी सशस्त्र दलाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे आणि दोन्ही बाजूंनी अनेक संयुक्त लष्करी सरावही केले आहेत. सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्यात बुधवारी रियाध येथे भेट झाली. यानंतर संरक्षण विषयक करार झाला. यामध्ये सर्व लष्करी साधनांचा समावेश आहे."हा वर्षानुवर्षे चाललेल्या चर्चेचा कळस आहे," असे एका वरिष्ठ सौदी अधिकाऱ्याने 'रॉयटर्स'शी बोलताना सांगितले."भारताशी आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. आम्ही हे संबंध वाढवत राहू आणि शक्य तितक्या मार्गाने प्रादेशिक शांततेत योगदान देण्याचा प्रयत्न करू," असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

भारतासाठी कराराचा अर्थ काय?

पाकिस्तान सौदी अरेबियाला आपल्या अणु छत्राखाली समाविष्ट करू शकतो, असे संकेत पाकिस्तानच्या राजदूतांनी दिल्याचे वृत्त 'एपी'ने दिले आहे. तसेच दोन्ही देशांविरुद्ध कोणतेही आक्रमण हे दोघांविरुद्ध आक्रमकता मानले जाईल, असे या करारात नमूद केल्याने, जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा संघर्ष झाला, तर सौदी अरेबिया पाकिस्तानची तळी उचलणार का? असा सवाल उपस्थित होऊ शकतो.मात्र, "हा करार विशिष्ट देशांना किंवा विशिष्ट घटनांना प्रतिसाद नाही... भारतासोबतचे आमचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आहेत. आम्ही हे संबंध वाढवत राहू आणि शक्य तितक्या मार्गाने प्रादेशिक शांततेत योगदान देण्याचा प्रयत्न करू," असे एका वरिष्ठ सौदी अधिकाऱ्याने 'रॉयटर्स'ला सांगितले.

सौदी अरेबियाची भारताबरोबरील संबंध कसे राहणार?

सौदी अरेबियाबरोबर भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. हा देश भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये भारत-सौदी द्विपक्षीय व्यापार ४१.८८ अब्ज डॉलर्स होता.पाकिस्तानबरोबर सौदी अरेबियाचा व्यापार हा केवळ ३ ते ४ अब्ज डॉलर्स इतकाच आहे. त्यामुळे सौदी अरेबिया पाकिस्तानसाठी भारतासोबतचे संबंध बिघडवेल, अशी शक्यता कमी असल्याचे भू-राजकीय विश्लेषक मानतात. "सौदी-पाकिस्तान संरक्षण करार कागदावर परस्पर वाटतो; परंतु प्रत्यक्षात तसे नाही. पाकिस्तानवर हल्ला झाल्यास रियाध भारताशी असलेले आपले संबंध धोक्यात घालणार नाही. मात्र भविष्यात इस्रायलने कधी सौदीवर हल्ला केला, तर धर्म, राजकारण आणि करारामुळे पाकिस्तान हस्तक्षेप करेल. त्यांच्यासाठी हे एक ओझे ठरेल," असे मत स्पेनमधील सहयोगी प्राध्यापक आणि विश्लेषक डॉ. बिलाल अफझल यांनी 'X' पोस्टद्वारे व्यक्त केले आहे.

इस्रायलला कोणता संदेश दिला जातोय?

सौदी अरेबिया - पाकिस्तानमधील संरक्षण करार हा इस्रायलसाठी एक प्रकारचा इशारा मानला जात आहे. कारण इराण, लेबनॉन, सीरिया, येमेन आणि आता कतारमध्ये इस्रायली कारवाया वाढल्या आहेत.दोहा येथे झालेल्या हल्ल्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मूक संमती असल्याचे मानले जाते. त्यामुळे आखाती अरब राष्ट्रांना अमेरिकेच्या विश्वासार्हतेबाबत चिंता वाटू लागली आहे.इस्रायल हा मध्य पूर्वेतील एकमेव अण्वस्त्रधारी देश आहे. त्यामुळे आता परस्पर संरक्षण करार करून सौदी अरेबिया-पाकिस्तान एकतेचा संदेश देत आहेत. इस्लामिक गटाची संयुक्त आघाडी अधोरेखित केली जात आहे, असे तज्ज्ञ मानतात.

पाकिस्तान मध्य पूर्वेतील संघर्षात ओढला जाणार?

वर्षानुवर्षे सौदी अरेबियाची मुख्य सुरक्षा चिंता येमेनच्या हुथी बंडखोरांबद्दल आहे. त्यांनी वारंवार सौदीच्या हद्दीत क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत.भविष्यात हा संघर्ष चिघळल्यास, नव्या करारानुसार, दोन्ही देशांविरुद्ध कोणतेही आक्रमण हे दोघांविरुद्ध आक्रमकता मानले जाईल. त्यामुळे पाकिस्तान हा मध्य पूर्वेतील दीर्घकालीन संघर्षात ओढला जाऊ शकतो.हा करार पाकिस्तानला मदत करण्याऐवजी आव्हानात्मक ठरू शकतो, असे विश्लेषक व राजकीय शास्त्राचे प्राध्यापक क्रिस्टोफर क्लेरी यांनी आपल्या 'X' पोस्टमध्ये नमूद केले आहे.दरम्यान, २०१५ मध्ये येमेनमध्ये सौदीच्या नेतृत्वाखालील हस्तक्षेपासाठी इस्लामाबादने सैन्य पाठवण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील संबंध बिघडले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT