दुबई : वृत्तसंस्था
सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी त्यांच्या क्षेत्रात लष्करी मोहीम थांबविण्यासाठी इराणवर दबाव आणण्याचे आवाहन जगातील नेत्यांना केले आहे. आम्ही आमच्या प्रयत्नांमध्ये यशस्वी ठरलो नाही तर 10-15 वर्षांमध्ये इराणसोबत मोठे युद्ध होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
वाल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सद्यस्थितीत ते अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. या क्षेत्रात लष्करी संघर्ष टाळण्यासाठी जागतिक स्तरावरील नेत्यांनी इराणवर आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचे निर्बंध घालावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. निर्बंधांमुळे इराण सरकारवर आणखी दबाव वाढेल, असे ते म्हणाले. दरम्यान, इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते बहराम कासमी यांनी या प्रतिक्रियेवर प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या सरकारला इशारा दिला आहे. 32 वर्षीय वारसाने युद्धाचा इशारा दिला आहे. त्यांना इतिहास माहिती नाही, असे ते म्हणाले. त्यांनी मृत्यूसोबत खेळ खेळू नये आणि इराणी राष्ट्राच्या संकल्पाला आव्हान देऊ नये, असे ते म्हणाले. नवशिके असलेले आणि अद्याप जोडे घालण्यासाठी पाय छोटे असलेल्या त्यांना युद्ध म्हणजे काय, याची माहिती नाही किंवा त्यांनी इतिहास वाचला नाही. अथवा दुर्दैवाने एका प्रतिष्ठित व्यक्तीशी चर्चा केली नाही, अशी प्रतिक्रिया कासमी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.