Rashid Khan On Kabul Airstrike: पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूलमध्ये काल रात्री एअर स्ट्राईक केला. त्यात ४०० निष्पाप लोकांचा जीव गेला. पाकिस्तानने जरी लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा केला असला तरी अफगाणिस्ताननं हा हल्ला रूग्णालयावर झाल्याचं सांगितलं आहे. त्यानंतर अफगाणिस्तानने देखील कडक प्रत्युत्तर देण्यात येईल असं जाहीर केलं.
दरम्यान, अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटपटू आणि कर्णधार राशीद खानने पाकिस्तानच्या या हल्ल्याचा कडक शब्दात निषेध केला आहे. तो आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणतो, 'काबूलवर करण्यात आलेल्या पाकिस्तानी एअर स्ट्राईकमध्ये निष्पाप सामान्य नागरिकांचा जीव गेल्याचं ऐकून वेदना झाल्या. नागरिकांची घरे, शैक्षणिक आणि वैद्यकीय ठिकाणांवर हल्ला करणं मग तो मुद्दाम असो किंवा चुकून झालेला असो ते वॉर क्राईमच आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मानवी जीवांबद्दलचा दाखवण्यात आलेला हा मोठा अनादर आहे. ही खूप काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. यामुळं फक्त घृणा आणि दरी वाढणार आहे. मी युएनला आणि इतर मानवी हक्क संस्थांना यामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती करतो. त्यांनी यातील दोषींना जबाबदार धरायला हवं. मी या कठीण काळात माझ्या अफगाण लोकांसोबत उभा आहे. आपण यातून बाहेर पडू आपण एक देश म्हणून यातून पुन्हा उभारी घेऊ.'
१६ मार्च रोजी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबूल शहरावर एअर स्ट्राईक केला होता. त्यानंतर अफगाणिस्तानने हा हल्ला ड्रग्ज रिहॅबिलिटेशन हॉस्पिटलवर केल्याचा दावा केला. यात ४०० निष्पाप लोकांचा जीव गेल्याचं सांगण्यात आलं. तर २५० पेक्षा जास्त लोकं जखमी झाली आहेत. हा आतापर्यंतच सर्वात भीषण हल्ला असल्याचं बोललं जात आहे.
हे रूग्णालय २००० खाटांचे होते. पाकिस्तानच्या हल्यात याचे मोठे नुकसान झालं आहे. आपत्कालीन विभागाला या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना बाहेर काढणं अवघड होत आहे. दरम्यान पाकिस्तानने मुद्दाम नागरिकांना टार्गेट केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. पाकिस्तानने त्यांनी अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर हल्ला केल्याचं सांगितलं. ही ठिकाणे अफगाणिस्तान पाकिस्तानमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी वापरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव जास्तच वाढला आहे. दोन्ही देश एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. दोन्ही देशांच्या सीमेवर एकमेकांविरूद्ध गोळीबार सुरू केला आहे.