Ecuador Priest Death Pudhari
आंतरराष्ट्रीय

Ecuador Priest Death: ‘एक दिवस आपणही मरणार आहोत’; चर्चमध्ये प्रवचन सुरू होतं अन् पाद्रींच्या डोक्यावर कोसळला क्रूस, VIDEO समोर

Ecuador Priest Death: इक्वेडोरमधील ग्वायाकिल शहरात चर्चमध्ये प्रवचन सुरू असताना भिंतीवर लावलेला जड लाकडी क्रूस पाद्रींच्या डोक्यावर कोसळला.

Rahul Shelke

Ecuador Priest Death: दक्षिण अमेरिकेतील इक्वेडोर देशातील ग्वायाकिल शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. चर्चमध्ये धार्मिक प्रवचन सुरू असताना भिंतीवर लावलेला मोठा लाकडी क्रूस अचानक पाद्रींच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या पाद्रींचा रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक कॅथोलिक समुदायात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फादर पॅट्रिक अल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी हे ग्वायाकिल शहरातील पर्पेतुओ सोकोरो चर्चमध्ये पाद्री म्हणून सेवा देत होते. शनिवारी ते चर्चमधील वेदीजवळ उभे राहून भाविकांना धार्मिक प्रवचन देत होते. त्याच वेळी त्यांच्या मागील भिंतीवर लावलेला मोठा लाकडी क्रूस अचानक निखळला आणि थेट त्यांच्या डोक्यावर कोसळला.

या अपघातात पाद्रींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी चर्चमधील प्रवचनाचे थेट प्रक्षेपण सुरू होते. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

मृत्यूबद्दलच सांगत होते पाद्री

या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अपघात होण्यापूर्वी पाद्री जीवन आणि मृत्यू याविषयीच प्रवचन देत होते. त्यांनी उपस्थित भाविकांना जीवनातील वेळेचे महत्त्व समजावून सांगितले.

ते म्हणाले होते, ‘एक दिवस येथे उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचा मृत्यू होणार आहे. त्यामुळे आपण आपला वेळ कोणत्या गोष्टींमध्ये घालवतो, याचा विचार केला पाहिजे. काही गोष्टींना आपण महत्त्व देतो; मात्र ईश्वरासोबत घालवलेल्या वेळेचे महत्त्व त्याहून अधिक आहे.’

यावेळी त्यांनी येशू ख्रिस्त यांच्या शिकवणीचाही उल्लेख केला. मोबाईलवर सतत स्क्रोल करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा ईश्वराच्या आराधनेत मन लावावे, असे आवाहन त्यांनी भाविकांना केले होते.

मात्र, जीवन आणि मृत्यूबद्दलचा संदेश देत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेमुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

चर्चने दिली पाद्रींच्या निधनाची माहिती

ग्वायाकिलच्या आर्चडायोसीसने रविवारी फादर पॅट्रिक अल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी यांच्या निधनाची अधिकृत माहिती दिली. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या शोकसंदेशातून त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले.

पर्पेतुओ सोकोरो चर्चमध्ये सेवा देणारे फादर पॅट्रिक आता ईश्वराच्या घरी गेले आहेत, अशा भावना चर्चकडून व्यक्त करण्यात आल्या. तसेच त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थनाही करण्यात आली.

या घटनेनंतर स्थानिक कॅथोलिक समुदायातून शोक व्यक्त केला जात आहे. प्रवचनाचे थेट प्रक्षेपण पाहणाऱ्या अनेकांनीही पाद्रींच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT