

पणजी : पणजी महापालिकाने शहरातील ऐतिहासिक आणि सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक असलेल्या चर्च स्क्वेअरच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी सुमारे ५ कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकल्पात वारसा जपत आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे, अशी माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, सुमारे २५ लाखांच्या सल्लागार सेवेसाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सल्लागाराकडून सविस्तर आराखडा, वास्तुरचना, अभियांत्रिकी डिझाइन, खर्चाचा अंदाज आणि आवश्यक मंजुरींसाठी कागदपत्रे तयार केली जाणार आहेत.
या प्रस्तावानुसार चर्च स्क्वेअरमध्ये हेरिटेज-आधारित दगडी फरसबंदी, सुशोभीकरण, स्मार्ट लाईटिंग, सीसीटीव्ही, वाय-फाय, ईव्ही चार्जिंग सुविधा, स्मार्ट पोल आणि आकर्षक बागा विकसित केल्या जाणार आहेत. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित, सुबक आणि सोयीस्कर बनवण्याचा त्यामागील उद्देश आहे.
याशिवाय परिसरात पादचारी-अनुकूल मार्ग, दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश, वाहतूक नियंत्रणासाठी बोलार्ड्स, एकात्मिक पावसाच्या पाण्याचा निचरा, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणपूरक सुविधा उभारण्याची योजना आहे. स्क्वेअरचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवत त्याचे आधुनिक रूपांतरण करण्यावर भर दिला जाणार आहे.
चर्च स्क्वेअर हे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांचे प्रमुख आकर्षण असल्याने येथील ऐतिहासिक ओळख अबाधित ठेवत परिसर अधिक सुशोभित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सावलीची आधुनिक संरचना, खुला रंगमंच, सार्वजनिक कला दालने, माहिती केंद्रे, तिकीट सुविधा, नैसर्गिक दगडी फरसबंदी आणि स्थानिक वृक्षांच्या लागवडीद्वारे पर्यावरणपूरक विकास केला जाणार आहे.