Pakistan Water Crisis indus water treaty
इस्लामाबाद / नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अधिकृत आकडेवारीनुसार, सिंधू नदी प्रणालीतील पाण्याचा पुरवठा यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्क्यांनी घटला आहे. 5 जून रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये केवळ 1.24 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नोंदवण्यात आला, जो गेल्या वर्षी याच दिवशी 1.44 लाख क्युसेक्स होता.
पाणी पुरवठ्यातील ही घट भारताने पाश्चिमात्य नद्या – सिंधू, झेलम आणि चिनाब यांच्यावरील नियंत्रण वाढवल्यामुळे झाल्याचे मानले जात आहे. याचा पाकिस्तानला जबर फटका बसला असून पाकिस्तानातील अनेक धरणातील पाणीसाठा आता मृत पातळीच्या जवळ पोहोचला आहेत. सीएनएन-न्यूज 18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तर्बेला धरण (सिंधू, खैबर पख्तुनख्वा): सध्याची पातळी 1465 मीटर. मृत पातळी – 1402 मीटर
चष्मा धरण (सिंधू, पंजाब): सध्याची पातळी 644 मीटर. मृत पातळी – 638 मीटर
मंगळा धरण (झेलम, मिरपूर): सध्याची पातळी 1163 मीटर. मृत पातळी – 1050 मीटर
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पाणीटंचाईमुळे पाकिस्तानातील खरीप हंगाम (जून–सप्टेंबर) धोक्यात आला आहे. 10 जूनपर्यंत संपणाऱ्या सुरुवातीच्या खरीप हंगामात पाकिस्तानात 21 टक्के पाणी तुटवड्याचा अंदाज आहे.
विशेषतः सियालकोटजवळील मराला हेडवर्क्स (चिनाब नदी) येथे 28 मे रोजी 26645 क्युसेक्स विसर्ग होता, तो 5 जून रोजी फक्त 3064 क्युसेक्सपर्यंत घसरला.
8 जूनपासून पाकिस्तानमध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असून, तापमान सामान्यापेक्षा 5–7 अंश सेल्सिअसने अधिक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे पंजाब, इस्लामाबाद, खैबर पख्तुनख्वा, काश्मीर व गिलगिट-बाल्टिस्तान या भागांतील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.
1960 मध्ये झालेल्या सिंधू जलवाटप करारानुसार बियास, रावी, सतलज या पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्यांमधील पाणी भारत वापरू शकतो. तर सिंधू, झेलम, चिनाब या पश्चिमेकडील नद्यांचे पाणी पाकिस्तान वापरू शकतो.
पाकिस्तानकडे वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याचा मर्यादित वापर भारताला करता येऊ शकतो. उदा. जलविद्युत निर्मितीसाठी छोटे प्रकल्प करण्याची मुभा आहे, पण जलसाठा किंवा प्रवाह थांबवण्यास मज्जाव आहे.
तथापि, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यानंतर राजनैतिक पाऊल म्हणून भारताने पाकिस्तानशी सवर्व व्यापारी संबंध तोडून टाकत या करारालाही स्थगिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 27 मे रोजी गुजरातमध्ये म्हटले होते की, “भारताच्या जनतेला त्यांच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.
आत्तापर्यंत फार काही केलेले नाही, फक्त पाण्याचा थोडा प्रवाह थांबवला आहे आणि धरणांतील कचरा स्वच्छ करण्यास सुरुवात केली आहे. पण त्यांच्याकडे (पाकिस्तान) भीतीचं वातावरण आहे.”
दरम्यान, रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. अशी भूमिका घेत सिंधू जलवाटप कराराला दिलेली स्थगिती मागे घेण्यास भारताने नकार दिला आहे.
पाकिस्तानने चिनाब नदीतील पाण्याच्या अल्प पुरवठ्यामुळे निर्माण झालेली स्थिती “संकटजनक” असल्याचे जाहीर केले असून, भारताच्या या कृतीला “युद्धाची कृती” म्हणून संबोधले आहे.
पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाच्या सचिवांनी भारताला सिंधू जलवाटप करारावरील स्थगिती हटविण्यासाठी अद्याप चार पत्रे पाठवली आहेत.