Pakistan Reaction On Ram Mandir Flag:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काल (दि. २५ नोव्हेंबर) अयोध्येतील राम मंदिरावर धर्म ध्वजारोहण करण्यात आलं. जरी हा भारताचा अंतर्गत विषय असला तरी पाकिस्ताननं यात नाक खुपसलं असून त्यानं थेट संयुक्त राष्ट्रांमध्ये तक्रार केली आहे. पाकिस्तानात होणाऱ्या धार्मिक अत्याचारावर, शोषणावर डोळे मिटून बसणाऱ्या पाकिस्ताननं भारतात अल्पसंख्याक आणि मुसलमानांच्या सांस्कृतिक वारसा धोक्यात असल्याचा गळा काढला आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा एकदा खोटं बोलले. ते म्हणाले, 'राम मंदिरावरील ध्वजारोहण हे भारतातील अल्पसंख्यांकांवर धार्मिक दबाव आणि मुस्लिम सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा जाणून बुजून संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे हे दर्शवते.'
अयोध्यामध्ये राम मंदिराची निर्मिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच करण्यात आली. त्यानंतर मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवा ध्वज मंदिराच्या शिखरावर फडकवला.
त्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रतिक्रिया दिली. त्यांनी अयोध्येत बाबरी मस्जिदीच्या जागी राम मंदिर निर्माण करणे आणि ध्वजारोहण करणे हे पाकिस्ताननं चिंता आणि गांभिर्याने घेतले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यानं बाबरी मस्जिदीचा उल्लेख करत ६ डिसेंबर १९९२ रोजी घडलेल्या घटनाचा देखील उल्लेख केला. पाकिस्ताननं भारतीय व्यवस्था ही अल्पसंख्यांकांशी भेदभाव करते असा बिनबुडाचा आरोप देखील केला.
दरम्यान, पाकिस्तानातील शारदा पीठ मंदिर, कराचीमधील १५० वर्षे जुने जाग नाथ मंदिर, रावळपिंडीतील १९३० मध्ये बनवण्यात आलेले मोहन मंदिर सारख्या अनेक हिंदू धार्मियांचा वारसा सांगणाऱ्या वास्तू नष्ट होत आहेत. या सर्व ठिकाणी पाकिस्तान सरकार आणि स्थानिक लोकांनी कब्जा केला आहे. यावर पाकिस्ताननं चकार शब्दही काढलेला नाही. मात्र पाकिस्तान भारतातील मस्जिदीवर बोलत आहे.
पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय समुदायाला भारतात इस्लामविरोधी वातावरण, हेट स्पीच वाढत आहे त्याकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
पाकिस्तान आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हणते, 'संयुक्त राष्ट आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी इस्लामिक वारसा आणि धार्मिक तसेच सर्व अल्पसंख्यांकांच्या सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण करावे. पाकिस्तान भारत सरकारला विनंती करते की त्यांनी देशातील मुसलमानांसह सर्व धर्मियांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी. त्यांची प्रार्थना स्थळांचे आंतरराष्ट्रीय मानवी हक्काच्या नियमाअंतर्गत संरक्षण करावे.'
पाकिस्ताननं नुकतेच अफगाणिस्तानातील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यात ९ निष्पाप मुलांना आपले प्राण गमवावे लागले होते. याबद्दल पाकिस्ताननं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.