पाक-व्याप्त काश्मीर विधानसभेत बोलताना चौधरी अन्वरुल हक.  
आंतरराष्ट्रीय

Pakistan Politician : लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत आम्हीच हल्ले केले : पाकिस्‍तानमधील नेत्याची उघड कबुली

पाक-व्याप्त काश्मीरमधील विधानसभेत चौधरी अन्वरुल हकने भारताविरोधात ओकली गरळ

पुढारी वृत्तसेवा

Pakistan Politician on Delhi blast : दिल्लीतील लाल किल्ल्याबाहेर १० नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्ब स्फोटात १५ लोक ठार आणि डझनहून अधिक जखमी झाले होते. या स्फोटात पाकिस्तानचाच हात आहे, अशी कबुली पाक-व्याप्त काश्मीर विधानसभेत राजकीय नेता चौधरी अन्वरुल हक याने दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोट हा पाकिस्ताननेच घडविल्याचे हक याने दिलेल्या विधानावर स्पष्ट झाले आहे.

आम्ही ते करून दाखवले

विधानसभेत बोलताना चौधरी अन्वरुल हक म्हणाला की, "मी आधीही म्हटले होते की, जर तुम्ही (भारताने) बलुचिस्तानला रक्तबंबाळ करणे सुरू ठेवले, तर आम्ही तुम्हाला लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत धडा शिकवू. दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटापासून ते जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममधील हल्ल्यापर्यंत भारताला लक्ष्य करणे हे पाकिस्तानने बदला म्हणून केलेले कृत्य होते. अल्लाहच्या कृपेने, आम्ही ते करून दाखवले आहे. आमच्या शूर जवानांनी ते केले आहे."

हकने दावा केलेला व्हिडिओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हकने दावा केला आहे की, पाकिस्तान समर्थित दहशतवादी मॉड्यूलने १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या हल्ल्याचा मास्टरमाइंड उमर उन नबी हा जैश-ए-मोहम्मदशी जोडलेल्या व्हाईट कॉलर नेटवर्कचा भाग असल्याचे म्हटले जात होते, ज्याला फरीदाबादमध्ये अटक करण्यात आली होती.

पहलगाममधील हल्ल्याचाही केला उल्लेख

हकने पहलगाममधील एप्रिलमध्ये भारतीय पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचाही उल्लेख केला. पाकिस्‍तानी दहशतवाद्‍यांनी केलेल्‍या भ्‍याड हल्‍ल्‍यात २६ निष्‍पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. बलुचिस्तानमध्ये भारताच्या कथित हस्तक्षेपाचा बदला घेण्यासाठी पाकिस्तान भारतीय शहरांमध्ये हल्ले करत आहे, असा पोरकट आरोपही त्याने केला.

दिल्ली बॉम्बस्फोटामागे जैश-ए-मोहम्मदचा कट

तपास संस्थांनी लाल किल्ल्याजवळील स्फोटाचा संबंध फरीदाबादमध्ये कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मदशी जोडला आहे. तपासात असे दिसून आले की उमर उन नबी हा डॉक्टरांच्या नेटवर्कचा भाग होता जे त्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांचा वापर करून रसायने आणि स्फोटके खरेदी करत होते. दहशतवादी बऱ्याच काळापासून भारतात स्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते. भारतीय सुरक्षा संस्थांनी अटक केलेले दहशतवादी ६ डिसेंबर रोजी मोठ्या आत्मघाती कार बॉम्बस्फोटाची योजना आखत होते. त्याला ऑपरेशन डी-६ असे नाव देण्यात आले होते. त्यात नऊ ते दहा दहशतवादी सहभागी होते. डॉ. उमर आणि डॉ. शाहीन शाहिद या नेटवर्कचे नेतृत्व करत होते. शाहीन हिने "जमात-उल-मोमिनीन" या नवीन नावाने जैशसाठी महिला दहशतवादी शाखा तयार करण्याची जबाबदारी देखील घेतली होती, असेही तपासात स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT