

Delhi Bomber House Demolished : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट घडवून आणणारा डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उन-नबी याचे जम्मू-काश्मीरमधील घर पाडण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे सुरक्षा दलांनी आज (दि. १४) पहाटे ही धडक कारवाई केली. सोमवारी (दि. ११ नोव्हेंबर) दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला होता तर २० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
आत्मघाती हल्लेखोर डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उन-नबी याच्या घराची सुरक्षा दलांनी आज पहाटे पाहणी केली. यानंतर संपूर्ण घर भुईसपाट केले. देशात दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्यांना कठोर संदेश देण्यासाठी ही धडक कारवाई करण्यात आली.
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवून आणणारा व्यक्ती काश्मीरमधील वैद्यकीय व्यावसायिक डॉ उमर उन नबी असल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे. हा आत्मघाती हल्ला होता. डॉ. उमर उन नबीच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या होत्या. तपासकर्त्यांना सुरुवातीलाच संशय आला होता की बॉम्बस्फोट करणारा डॉक्टर उमर होता, ज्याने स्फोटाच्या ११ दिवस आधी हल्ल्यात वापरलेली पांढरी ह्युंदाई आय२० खरेदी केली होती. काश्मीरच्या पुलवामा येथील त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे घेतलेले डीएनए नमुने नंतर कारमधून सापडलेल्या मानवी अवशेषांशी जुळवले गेले, ज्यामुळे डॉक्टर उमर हा स्फोट झाला तेव्हा हुंडई आय२० चालवत होता हे स्पष्ट झाले आहे.