Pakistan Human Placenta Trafficking: पाकिस्तानात कशाची तस्करी होईल याचा काही नेम नाही. आता एका वृत्तानुसार पाकिस्तानातून बाळाच्या नाळेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. याबाबतच्या रॅकेटचा नुकतेच भांडाफोड झाला आहे. या कारवाईत किमान ५०० किलो प्लेसेंटा (बाळाची नाळ) मिळाली आहे.
गर्भात असताना बाळाला पोषक तत्वे पोहचवण्यासाठी ही नाळ महत्वाची असते. ही नाळ आईचा गर्भाशय आणि बाळाच्या नाभीशी जोडलेली असते. बाळाचा जन्म झाला की ही नाळ कापून टाकली जाते. तसेच त्याची सुरक्षितरित्या विल्हेवाट देखील लावली जाते. मात्र पाकिस्तानात ही नाळ परदेशात विकून मोठा धंदा मांडला जात आहे. या नाळेचा वापर हा अँटी एजिंग इंजेक्शनमध्ये केला जातो. या इंजेक्शनची किंमत लाखो रूपयांमध्ये जाते.
गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यात अधिकाऱ्यांना तब्बल ५०० किलो प्लेसेंटा मिळाली. या प्रकरणी पोलिसांनी पाच लोकांना अटक केली आहे. तपास यंत्रणांनी सांगितलं की एका घरात ट्रॉलीमध्ये वाळलेली नाळ ठेवली होती. फेडरल इनव्हेस्टिंगेशन एजन्सीने नुकतेच इस्लामाबाद एअरपोर्टवर १०० किलो मानवी अंग हस्तगत केले होते. हे मानवी अंग व्हिएतनामला पाठवण्यात येणार होते.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार पाच आरोपी रूग्णालयांतून ८०० रूपयाला प्लेसेंटा खरेदी करत होते. अनेक रूग्णालयात देखील या तस्करांचे नेटवर्क पसरले आहे. काही डॉक्टर आणि नर्स देखील या नेटवर्कमध्ये सामील असण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या नाळेची विल्हेवाट लावण्याची सोय ही रूग्णालयातच असते. मात्र पैशाच्या मोहापायी डॉक्टर ही नाळ विकत असण्याची शक्यता आहे. ही नाळ वाळवून ती परदेशात पाठवली जाते.
याचा वापर नंतर अँटी एजिंग इंजेक्शनमध्ये केला जातो. हे एक इंजेक्शन नंतर ७ लाख रुपयांना विकलं जातं. तपास यंत्रणांच्या मते इस्लामाबाद बरोबरच लाहोर, पेशावर आणि रावळपिंडी या मोठ्या शहरात देखील असं तस्करीचं नेटवर्क काम करत असल्याचा संशय आहे. याचबरोबर इमिग्रेशन ऑफिसर, रूग्णालयातील वेस्ट मॅनेजमेंट कंपन्या देखील या रॅकटमध्ये सामील असण्याची शक्यता आहे.