Pakistan loan request 2025 Pudhari
आंतरराष्ट्रीय

Pakistan loan request 2025: IMF च्या मदतीनंतरही पाकिस्तान असमाधानी! आणखी 4.9 अब्ज डॉलर कर्जासाठी चीन, सौदी, आशिया बँकेसमोर पसरले हात

Pakistan loan request 2025: पाकिस्तानचा विकासदर 2.68 टक्क्यांवर ठप्प

Akshay Nirmale

Pakistan loan request 2025

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आर्थिक वर्ष 2024-25 साठी निश्चित केलेले विकासाचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आल्याचे वृत्त आहे. सरकारने 3.6 टक्के आर्थिक वाढीचे लक्ष्य ठेवले होते, मात्र प्रत्यक्षात केवळ 2.68 टक्के वाढ साधता आली.

या अपयशानंतर आता परकीय निधीची गरज भागवण्यासाठी आणि विदेशी चलन साठा (foreign exchange reserves) वाढवण्यासाठी 4.9 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज घेण्यासाठी पाक सरकारने बँका आणि इतर देशांकडे हात पसरायला सुरवात केली आहे.

आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज घेणार

पाकिस्तानच्या ARY News च्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तान सरकार ही रक्कम विविध आंतरराष्ट्रीय बँकांकडून कर्ज म्हणून उचलणार आहे. काही कर्जे अल्पकालीन स्वरूपाची असतील तर काही दीर्घकालीन असतील.

इस्लामाबाद सरकारने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) 1.3 अब्ज डॉलर्सचा "तात्काळ" मदतपात्र निधी (बेलआउट) मिळवला. मात्र, या मदतीनंतरही देशाच्या एकंदर आर्थिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे सरकारने अधिक निधी उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्या बँकांकडून किती कर्ज हवे?

पाकिस्तान सरकार चार प्रमुख आंतरराष्ट्रीय बँकांशी कर्जाबाबत चर्चा करत आहे, ज्यामध्ये पुढील प्रस्ताव समाविष्ट आहेत:

  1. इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनाकडून (ICBC) – 1.1 अब्ज डॉलर

  2. स्टँडर्ड चार्टर्ड बँक – 500 दशलक्ष डॉलर (म्हणजेच 0.5 अब्ज डॉलर)

  3. दुबई इस्लामिक बँक – 500 दशलक्ष डॉलर

  4. आशियाई विकास बँकेकडून (ADB) – 500 दशलक्ष डॉलर

या कर्जासाठी वाणिज्यिक हमी (commercial guarantee) पाकिस्तानकडे मागितली जात आहे

पाकवर परकीय कर्जाचा बोजा

पाकिस्तानवर प्रचंड परकीय कर्जाचा बोजा आहे आणि त्याला कर्जफेडीच्या (debt repayment) मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय, जागतिक भांडवली बाजारांमध्ये (global capital markets) प्रवेश मर्यादित आहे. त्यामुळे, पाकिस्तान आपली आर्थिक गरज भागवण्यासाठी असे कर्ज घेण्याचा मार्ग अवलंबत आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने पाकिस्तानला जून 2025 पर्यंत परकीय चलन साठा $13.9 अब्जपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट दिले आहे. सध्या पाकिस्तानकडे अंदाजे $14 अब्ज डॉलर्सचा साठा आहे, जो सुमारे तीन महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा मानला जातो.

राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक कामगिरी

इस्लामाबादमध्ये झालेल्या "नॅशनल अकाउंट्स कमिटी"च्या बैठकीत ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे. या बैठकीचे अध्यक्ष नियोजन सचिव होते. पाकिस्तानचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न (GDP) सुमारे 411 अब्ज डॉलर्स एवढे झाले आहे.

पाकच्या सेवा क्षेत्रात वाढ

पाकिस्तानातील विकासदर क्षेत्रानुसार भिन्न होता. कृषी क्षेत्रात 1.8 टक्के वाढ झाली. ही वाढ थोडी सकारात्मक मानली जात आहे. औद्योगिक क्षेत्रात 1.14 टक्के घट झाली. ही बाब चिंताजनक मानली जात आहे.

सेवा क्षेत्रात मात्र जुलै ते मार्च दरम्यान तब्बल 39 टक्के वाढ झाली. ही कामगिरी लक्षवेधी मानली जात आहे.

अल्पकालीन कर्जे - 2.64 अब्ज डॉलर्स

पाकिस्तान सुमारे 2.64 अब्ज डॉलर्सची अल्पकालीन कर्जे घेणार आहे. ही कर्जे अंतरराष्ट्रीय व्यावसायिक बँकांकडून (commercial banks) घेतली जातील. यासाठी 7 टक्के ते 8 टक्के दरम्यान व्याजदर अपेक्षित आहे. विशेष बाब म्हणजे, या कर्जावर IMF सारख्या कडक अटी किंवा कामगिरीवर आधारित निकष (performance benchmarks) लावले जाणार नाहीत.

दीर्घकालीन कर्जे – 2.27 अब्ज डॉलर्स

याशिवाय, पाकिस्तान सरकारने आणखी 2.27 अब्ज डॉलर्सचे दीर्घकालीन कर्ज घेण्याचीही तयारी सुरू केली आहे. ही रक्कमसुद्धा व्यावसायिक बँकांकडूनच उचलण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT