Asim Munir US visit
इस्लामाबाद/वॉशिंग्टन : पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर पुन्हा एकदा अमेरिकेला भेट देणार आहेत. ही त्यांची दोन महिन्यांत दुसरी अमेरिका यात्रा असून, अमेरिकेसोबतच्या लष्करी आणि धोरणात्मक संबंधांमध्ये वाढ होत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
या वेळी मुनीर यांची भेट यूएस सेंट्रल कमांडचे (CENTCOM) कमांडर जनरल मायकेल कुरिल्ला यांच्या निरोप समारंभासाठी आहे. कुरिल्ला हे या महिन्याअखेरीस सेवानिवृत्त होत आहेत.
त्यांनी पाकिस्तानला "आतंकविरोधी लढ्यात एक विलक्षण भागीदार" म्हणून गौरविले होते. तसेच पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च लष्करी सन्मान देऊन गौरव केला होता.
केवळ दोन महिन्यांपूर्वीच कुरिल्ला यांनी पाकिस्तानच्या मदतीने इसिस-खोरासान (ISIS-K) च्या पाच दहशतवाद्यांना पकडण्यात आले, हे जाहीर केले होते. अमेरिकेच्या हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीसमोर बोलताना त्यांनी म्हटले होते, "पाकिस्तान हा दहशतवादविरोधी लढ्यात एक अद्भुत भागीदार आहे... म्हणूनच आपल्याला पाकिस्तान आणि भारत दोघांशी संबंध ठेवावे लागतील."
या वक्तव्यामुळे भारताने नाराजी व्यक्त केली होती, कारण भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर दहशतवाद प्रायोजक देश म्हणून शिक्का मारण्याचा प्रयत्न करत होता.
पाकिस्तानने देखील कुरिल्ला यांच्या गौरवाला उत्तर दिले. जुलै महिन्यात कुरिल्ला इस्लामाबाद दौऱ्यावर असताना त्यांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान 'निशान-ए-इम्तियाज' प्रदान करण्यात आला.
या दरम्यान एक महत्त्वाचा राजनैतिक आणि लष्करी घडामोड घडली. असीम मुनीर आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात खासगी लंच मिटिंग झाली.
मे महिन्यात भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव निर्माण झाला होता. यावेळी ट्रम्प यांनी हस्तक्षेप करून युद्ध टाळल्याचा दावा केला. "मी त्यांना (मुनीर) इथे बोलावलं कारण मी त्याचे आभार मानू इच्छित होतो. युद्धात न पडता ते थांबवले म्हणून," असे ट्रम्प म्हणाले होते.
याला उत्तरादाखल पाकिस्तानकडून ट्रम्प यांना नोबेल शांतता पारितोषिकासाठी शिफारस करण्यात आली आणि काही दिवसांतच पाकिस्तान सरकारने त्यांचे औपचारिक नामांकनही केले.
अमेरिकेचे पाकिस्तानविषयी बदलते धोरण, विशेषतः CENTCOM प्रमुखांचे वक्तव्य आणि ट्रम्प यांच्या पाकिस्तानशी जवळीक यामुळे भारतात अस्वस्थता आहे.
एकीकडे भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या दहशतवाद समर्थनाच्या विरोधात प्रचार करत आहे, तर दुसरीकडे अमेरिकेकडून पाकिस्तानच्या लष्करी कार्यक्षमतेचे आणि सहकार्याचे कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे भारतावर अमेरिकेकडून 50 टक्के टॅरिफची घोषणा केली.
पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांची ही अमेरिका भेट राजनैतिकदृष्ट्या आणि लष्करीदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. कुरिल्ला यांच्या निरोप समारंभाच्या निमित्ताने होणारी ही भेट अमेरिकेच्या पुढील CENTCOM नेतृत्वाशी संबंध दृढ करण्यासाठीही महत्त्वाची ठरू शकते.
भारतासाठी ही परिस्थिती एक नवीन आव्हान निर्माण करत आहे. येत्या काळात भारत-अमेरिका आणि पाकिस्तान-अमेरिका संबंधांची दिशा काय असेल, याबाबतही उत्सुकता असणार आहे.