France wildfire | दक्षिण फ्रान्समध्ये वर्षातील सर्वात भीषण वणवा; 27000 एकर जंगल जळून खाक
Aude Southern France forest fire 27,000 acres burned
पॅरिस : दक्षिण फ्रान्समधील 'ऑड' (Aude) या विभागात सुरू झालेल्या भयानक वनवनीने आतापर्यंत तब्बल 12000 हेक्टर (सुमारे 27000 एकर) क्षेत्र जळून खाक केले आहे. या आगीत एक वृद्ध महिला मृत्यूमुखी पडली असून, नऊ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्यांना गंभीर भाजले आहे, अशी माहिती ऑड प्रीफेक्चरने दिली आहे.
25 घरे उद्ध्वस्त, शेकडो नागरिक विस्थापित
या आगीत 25 घरे पूर्णपणे जळून खाक झाली किंवा गंभीरपणे नुकसान झाले आहे. काही गावांचे अंशतः स्थलांतर करण्यात आले असून, अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. कॅम्पिंग साईट्सही तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.
1800 अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नशील
फ्रेंच अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन दलाचे सुमारे 1800 जवान आग आटोक्यात आणण्यासाठी लढा देत आहेत. कॅनाडेअर CL-415 सारख्या विमानांद्वारे हवेतूनही पाण्याचा मारा सुरू आहे. फॉनजोंकूस (Fontjoncouse) आणि जॉन्कियरेस (Jonquieres) या भागांमध्ये आग अधिक तीव्र आहे.
हवामानामुळे अडथळे, पण ओलाव्याने दिलासा
ऑड प्रीफेक्चरच्या सचिव ल्युसी रोएश (Lucie Roesch) यांनी सांगितले की, "सध्या आग ज्या भागात पसरत आहे, तिथे हवामानाचे सर्व घटक आगीच्या प्रसाराला पोषक आहेत. आम्ही आगीच्या कडांवर आणि मागच्या बाजूंवर लक्ष ठेवून संभाव्य पुनरागमन थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत."
हवेत आर्द्रता वाढल्यामुळे आगीचा वेग काहीसा मंदावला असला, तरी ही दीर्घकाळ चालणारी लढाई असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रपती आणि पंतप्रधानांची तत्काळ प्रतिक्रिया
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरून प्रतिक्रिया देताना सांगितले की, "राष्ट्राच्या सर्व यंत्रणा कामावर आहेत. नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी." दरम्यान, पंतप्रधान फ्रान्स्वा बायरो (Francois Bayrou) यांनी घटनास्थळी भेट देण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, कमी पावसाळा, वाढते तापमान, सुकलेली झाडे आणि खास करून द्राक्षबागांचे कमी होणारे क्षेत्र – जे पूर्वी आगीचा अडथळा ठरत होते – यामुळे आगीचा प्रसार अधिक तीव्र झाला आहे.
फ्रान्समध्ये यंदा 9000 हून अधिक आगीच्या घटना
आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या उन्हाळ्यात फ्रान्समध्ये 9000 हून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत, त्यापैकी बहुतांश मध्य सागरी किनाऱ्यालगतच्या भागात झाल्या आहेत. परंतु, ही ऑड विभागातील आग सध्यापर्यंतची सर्वात मोठी आहे.

