Pak-Afghan Conflict Pudhari Photo
आंतरराष्ट्रीय

Pak-Afghan New Conflict: पाकिस्तान - अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्षाचा भडका; सामान तिथंच टाकून नागरिकांचे पलायन

पाकिस्तान - अफगाणिस्तान यांचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप; सौदी अरेबियातील शांती वार्ता फिसकटली

Anirudha Sankpal

Pak-Afghan New Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढला असून शुक्रवारी रात्री उशिरा पाकिस्तानमधील चमन आणि अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डक या सीमाभागात दोन्ही देशांच्या सुरक्षा दलांमध्ये तुफान गोळीबार झाला. यात अनेक मोटारचे गोळे एकमेकांच्या दिशेने फायर करण्यात आले. काही आधुनिक शस्त्रांचा देखील वापर करण्यात आला.

यामुळे सीमाभागात तणावाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांमध्ये सौदी अरेबिया इथं शांततेबाबत चर्चा सुरू होती. ही चर्चा फिसकटल्यानंतर सीमेवर हा गोळीबार सुरू झाला आहे.

शुक्रवारी रात्री अचानक सुरू झालेल्या या गोळीबारीमुळं सीमाभागात राहणाऱ्या लोकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमधील स्पिन बोल्डकमधून पाकिस्तानच्या दिशेने फायरिंग झालं तर पाकिस्तानच्या चमनकडून अफगाणिस्तानच्या दिशेला फायरिंग झालं. सतत होणाऱ्या या फायरिंगमुळे दोन्ही देशातील शेकडो कुटुंबे आपला जीव मुठीत घेऊन सुरक्षित स्थान पळू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांना त्यांचे सामान गोळा करण्याची देखील संधी मिळाली नाही.

दिलासादायक बाब म्हणजे या गोळीबारात कोणाचा मृत्यू झाल्याची सध्या तरी बातमी नाही. मात्र सीमेवर स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. नेहमीप्रमाणे अफगाणिस्ताननं पाकिस्तानला अन् पाकिस्ताननं अफगाणिस्तानला या संघर्षाला जबाबदार धरलं आहे. अफगाण तालिबानचे प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी कंधारच्या स्पिन बोल्डक जिल्ह्यात पहिल्यांदा हल्ला केला. त्यामुळं इस्लामिक अमिरातच्या सुरक्षा दलांना त्याचे प्रत्युत्त देणे भाग पडले.

दुसरीकडं पाकिस्तान सराकरनं अफगाणिस्तानचे आरोप फेटाळून लावले. पाकिस्तान प्रधानमंत्री कार्यालयाचे प्रवक्ते मोशर्फ जैदी यांनी अफगाण सुरक्षा दलांनी सीमेवर येत कारण नसताना गोळीबार केला. त्यांच्या या कृतीनंतर पाकिस्ताननं आपली क्षेत्रीय संप्रभुता आणि आपल्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी यापूर्वी कतार आणि तुर्कीमध्ये शांती वार्ता झाली होती. मात्र त्या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही. नुकतेच सौदी अरेबियात देखील पाक अन् अफगाण अधिकारी शांती प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत होते. मात्र त्यातूनही हाती काही लागलं नाही. यानंतर सीमेवर पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT