

Asim Munir appointed CDF Of Pakistan: पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारनं अखेर फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना पाकिस्तानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस अर्थात CDF नियुक्त केलं आहे. आता मुनीर हे पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली लष्करी अधिकारी झाले आहेत. हे पद नुकतंच तयार करण्यात आलं आहे. त्यामुळं अण्वस्त्रधारी पाकिस्तानच्या सर्व लष्कराची सूत्रे मुनीर यांच्या हातात एकवटली आहेत. ते आता तीनही सैन्यदलाचे प्रमुख झाले आहेत. ते या पदावर पाच वर्षासाठी असणार आहेत.
शरीफ यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट करण्यात आली आहे. त्यात मुनीर यांना चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस या दोन्ही पदांवर नेमणूक केल्याची माहिती देण्यात आली.
'पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी फिल्ड मार्शल सईद असिम मुनीर यांना COAS त्याचबरोबर CDF पदी पुढच्या पाच वर्षासाठी नियुक्त केलं आहे.'
सीडीएफ हे पक फक्त तीन लष्करी दलांचा प्रमुख यापुरतंच मर्यादित नाहीये. तर नॅशनल स्ट्रेटेजिक कमांड देखील हातात येणार आहे. ही नॅशनल स्ट्रॅटेजिक कमांड ही देशाच्या अण्विक शस्त्रांचे संचालन करते. यामुळं आता मुनीर हे देशातील एकमेव सर्वत शक्तीशाली लष्करी अधिकारी बनले आहेत.
याचबरोबर मुनीर यांना या नव्या CDF पदामुळं देशाच्या राष्ट्रपतींना असतं त्या प्रकारचं कायद्याचं संरक्षण देखील मिळणार आहे. त्यांच्यावर आता तहयात कोणताही कायदेशीर खटला चालवता येणार नाही. हेच कायद्याचं संरक्षण आता वायू सेना आणि नौसेनेच्या प्रमुखांना देखील मिळणार आहे. या नव्या नियुक्तीमुळं आता सरकारचे लष्करावरील नियंत्रण देखील अजून कमी होणार आहे.