Lashkar-e-Taiba terrorist Saifullah Kasuri on Modi
नवी दिल्ली : जम्मू काश्मिरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर सैफुल्ला कसुरी याचा हात असल्याचे सांगितले जाते. या हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या कसुरी याने नुकतेच लाहोरमधील सभेत भारताविरोधात भडक विधानं केल्याचे समोर आले आहे.
यावेळी सैफुल्ला कसुरी याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून धमकी दिल्याचे समोर आले आहे. नरेंद्र मोदींना आम्ही गोळीबाराला घाबरणारे वाटलो काय? तो त्यांचा गैरसमज आहे, ती त्यांची चूक आहे, असे वक्तव्य कसुरी याने केले आहे.
पंतप्रधान मोदींनी भुज येथील सभेत पाकिस्तानने दहशतवाद थांबवला नाही तर भारताच्या गोळ्यांना सामोरे जावे लागेल, असं म्हटलं होतं.
एवढ्यावरच न थांबता सैफुल्ला याने त्याचे मूळ गाव कसूरमधील जनतेला उद्देशून म्हटले आहे की, “मी भारताच्या हृदयात काट्यासारखा सलतो. माझ्या अल्लाहला धन्यवाद देतो. पुढची निवडणूक मोदींच्या विरोधात मी लढतो नसतो का? असेही सैफुल्ला म्हटला आहे.
विशेष म्हणजे, या सभेला पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांचे अधिकारी, आयएसआयचे सदस्य, इतर दहशतवादी लीडर उपस्थित होते. ही घटना पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात कारवाई केल्याच्या दाव्यांना खोटं ठरवणारी आहे.
कसुरीने या सभेत गर्वाने म्हटलं, “माझ्यावर पहलगाम हल्ल्याचा आरोप झाल्यानंतर मी अधिक प्रसिद्ध झालो आहे.” यापूर्वी कसुरीने या हल्ल्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला होता. मात्र आता तो खुलेआम कटात सामील असल्याची कबुली देत आहे.
भारताविरोधात सायबर हल्ल्याचा दावा
कसुरीने दावा केला की, पाकिस्तानने 1971च्या युद्धाचा सूड घेतला असून त्यांच्या सायबर टीमने भारताच्या दळणवळण आणि रेल्वेप्रणालीवर यशस्वी हल्ले केले आहेत. हा दावा आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर चिंता निर्माण करणारा आहे.
या सभेत कसुरीसोबत अमेरिकी दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलेला तल्हा सईद (हाफिज सईदचा मुलगा), आणि पंजाब असेंब्लीचे स्पीकर मलिक अहमद खान यांची उपस्थिती होती. ही बाब पाकिस्तानमधील शासन आणि दहशतवादी गटांमधील जवळीक स्पष्ट करणारी आहे.
तल्हा सईदने आपल्या भाषणात भारताच्या ऑपरेशन 'सिंदूर'च्या प्रतिउत्तरात पाकिस्तानच्या ‘बुनियान अल-मरसूश’ मोहिमेचे कौतुक केले. “जिहाद करणाऱ्यांना अल्लाह आवडतो,” असं तो म्हणाला, त्यावेळी कसुरी आणि इतरांनी जल्लोष केला.
हल्ल्याच्या आधी कसुरी पंजाबमधील कंगनपूर लष्करी तळावर दिसला होता. तिथं त्याने पाकिस्तानी सैनिकांना भारताविरोधात भडकावलं. हाफिज सईदच्या आदेशावरून कसुरी, तल्हा आणि ‘द रेसिस्टन्स फ्रंट’चा शेख सज्जाद गुल यांनी प्रशिक्षित दहशतवाद्यांना पहलगाममध्ये हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं.
मिली मुस्लिम लीग आणि जमात-उद-दावा या संघटनांच्या माध्यमातून ‘काश्मीरमधील जिहादसाठी’ निधी संकलन सुरू असल्याचं निदर्शनास आलं आहे. कसुरी आधी या संघटनांशी सक्रियपणे जोडलेला होता.
पाकिस्तानच्या अंतर्गत धोरणांमध्ये दहशतवाद्यांना मिळणारा मोकळा वावर आणि अधिकृत पाठिंबा यामुळे जागतिक समुदायाची चिंता वाढत आहे. भारताने या प्रकाराला आंतरराष्ट्रीय स्तरावर गंभीरपणे हाक दिली असून लष्करी आणि मुत्सद्दी पातळीवरही पावले उचलली जात आहेत.