

BSF Women Soldiers in operation Sindoor
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) सात महिला जवानांनी पाकिस्तानला घाम फोडल्याचे समोर आले आहे.
प्रत्यक्ष लढाई काळात तीन दिवस आणि तीन रात्र सतत चाललेल्या पाकिस्तानी गोळीबाराला तोंड देत या रणरागिनींनी पाक सैन्याला पळवून लावले.
या शौर्यगाथेचं नेतृत्व केलं सहायक कमांडंट नेहा भंडारी यांनी. खरे तरं त्यांना वरिष्ठांकडून मागे हटण्याचा पर्याय देण्यात आला होता. मात्र, त्या आणि त्यांच्या महिला सहकाऱ्यांनी तो पर्याय नाकारत शत्रूला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे पाकिस्तानी सैनिकांना त्यांच्या पोस्ट्स सोडून अक्षरशः पळ काढावा लागला.
या सर्व सात महिला जवानांची ही पहिलीच प्रत्यक्ष लढाई होती. त्यातील बहुतेकांनी गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये BSF मध्ये प्रवेश केला होता. पण, त्यांनी ही एक सुवर्णसंधी मानून अत्यंत धैर्यानं आणि शिस्तीनं आपली जबाबदारी पार पाडली.
नेहा भंडारी या स्वतः केवळ तीन वर्षांपूर्वी BSF मध्ये सामील झाल्या होत्या आणि भारताच्या सीमेवर महिलांच्या नेतृत्वात प्रथमच प्रत्यक्ष लढाईसाठी त्यांना संधी मिळाली.
त्यांना देशसेवेचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्करात आणि दोघेही पालक केंद्रीय राखीव पोलिस दलात (CRPF) असल्यामुळे देशसेवेसाठीचं त्यांचं समर्पण वेगळंच होतं.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत BSF ने 76 पाकिस्तानी चौक्या, 42 संरक्षण ठिकाणं, 3 दहशतवादी लाँच पॅड्स, आणि 70 पाकिस्तानी फ्रंट पोस्ट्स उध्वस्त केल्या. या मोहिमेत, नेहा भंडारी आणि त्यांच्या सहकारी महिलांनी जवळपास 150 मीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानी पोस्ट्सवरून आलेल्या गोळीबाराचा जोरदार प्रतिकार केला.
“तीन पोस्ट्स माझ्या नियंत्रणाखाली होत्या. आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रत्युत्तर दिलं. जिथं जिथं शत्रू होता, तिथं तिथं आमची तोफ होती. आम्ही त्यांना त्यांच्या चौक्या सोडायला भाग पाडलं,” असं नेहा भंडारी यांनी सांगितलं.
या सात महिलांमध्ये पंजाबच्या दोन अनुभवी जवान – मनजीत कौर आणि मलकित कौर यांचा समावेश होता. त्यांनी महत्त्वाची निरीक्षण चौकी आणि बंकर सांभाळले. उर्वरित चार महिला जवानांमध्ये स्वप्ना राठ व शांपा बासाक (पश्चिम बंगाल), सुमी एक्सेस (झारखंड), आणि ज्योती बनियन (ओडिशा) या नवीन भरती झालेल्या होत्या.
दरम्यान, या घटनेनंतर आता नुकतेच प्रथमच राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) 17 महिला अधिकारी प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झाल्या आहेत. हे देखील ऐतिहासिकच आहे.
भारतीय लष्करात महिलांना अजूनही लढाऊ भूमिकांमध्ये पूर्णपणे सामावून घेतलेलं नाही, पण BSF च्या या पराक्रमी महिलांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.
नेहा भंडारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या साहसाचं महत्त्व इतकं आहे की ते भविष्यातील अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.