

PM Narendra Modi in Kanpur
कानपूर : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेले नाही. पाककडून कोणतीही दहशतवादी कारवाई झाली, तर त्याला 'करारा जवाब' दिला जाईल" असा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. 30 मे 2025 रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
"पाकिस्तानच्या सैन्याला भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यांमुळे मोठा धक्का बसला असून, त्यांनी युद्धविरामाची विनंती केली," असेही त्यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केले, या ऑपरेशनद्वारे भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून मोठे यश मिळवले आहे, असेही मोदींनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या सभेत भारतीय लष्कराचे जोरदार कौतुक केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’चा विशेष उल्लेख करत, ही कारवाई भारताच्या स्वदेशी संरक्षण क्षमतेचे प्रतीक ठरल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, ऑपरेशन सिंदूरने भारताच्या शत्रूंना हादरवून टाकले आणि ब्रह्मोस सारख्या देशात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांनी त्यांना झोप उडवली.
पंतप्रधान म्हणाले, "पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना आता भारताकडून कडक उत्तर मिळेल. कानपुरी भाषेत सांगायचं तर, शत्रू जिथे असेल, तिथे त्याला धडा शिकवला जाईल..
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांचा वापर करून भारताने आत्मनिर्भरतेची प्रगती दाखवली आहे. "ब्राह्मोस मिसाइल आणि इतर स्वदेशी शस्त्रास्त्रांनी शत्रूच्या भूमीत घुसून दहशतवादी तळ नष्ट केले.
भारताच्या शत्रूंना कठोर इशारा देताना मोदी म्हणाले, “कोणीही भ्रमात राहू नये. ऑपरेशन सिंदूर दरम्यान जे शरण येत होते, त्यांनी हे लक्षात ठेवावे – ऑपरेशन अजून संपलेले नाही.”
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय मुलींचा आणि बहिणींचा संताप कृतीमध्ये रूपांतरित झाला, हे जगाने पाहिले. आम्ही पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ शेकडो मैल आत घुसून उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तान इतका हादरला की त्यांना संघर्ष थांबवण्यासाठी विनवण्या कराव्या लागल्या.
दहशतवादाविरोधातील भारताच्या ठाम भूमिकेवर भाष्य करत मोदी म्हणाले की, भारताने तीन गोष्टी स्पष्ट केल्या आहेत: प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला कडक प्रत्युत्तर दिले जाईल, आणि त्यासाठी वेळ, पद्धत आणि अट या भारतीय लष्कराच्या हातात असतील.
अणु युद्धाच्या धमक्यांना भारत घाबरणार नाही. दहशतवादी कारवाया घडवणारे मास्टरमाइंड आणि त्यांना मदत करणारी सरकारे – दोघांनाही सारखेच उत्तर दिले जाईल. मोदी पुढे म्हणाले, “पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा जुनाच डाव भारत आता मान्य करणार नाही.”
मोदी म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरमुळे भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे सामर्थ्य जगापुढे आले. Make in India अंतर्गत तयार झालेल्या आपल्या ब्रह्मोस मिसाईलने शत्रूच्या भूमीत घुसून अगदी नेमक्या ठिकाणी विध्वंस केला.
एकेकाळी येथून पारंपरिक उद्योग निघून जात होते. पण आता मोठ्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्या इथे येत आहेत. जवळच अमेठीत AK-203 रायफलचे उत्पादन सुरू झाले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान शत्रूला झोप उडवणारी ब्रह्मोस मिसाईल – तिचा नवा पत्ता आता उत्तर प्रदेश आहे.”
कानपूरमधील सभेत मोदींनी विरोधकांवर टीका केली. "काही लोक पाकिस्तानला खुश करण्यासाठी वक्तव्ये करत आहेत. अशा लोकांना माफ करणे योग्य आहे का?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. "दुर्दैवाने, काही लोकांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर भ्रम निर्माण करण्याची संधी मिळते," असे ते म्हणाले.