Operation Sindoor
वॉशिंग्टन : पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यानंतर कोणताही प्रतिहल्ला करण्याचा विचारसुद्धा करू नये. कारण, दहशतवाद्यांवर कारवाई करणे हा भारताचा अधिकार आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानला बजावले आहे. त्यामुळे पाकच्या गोटात खळबळ माजली आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाई करून पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर अमेरिकेने पाकला सबुरीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा मोठा मुखभंग झाला आहे.
भारताविरुद्ध कारवाई करण्यासाठी आम्ही आमच्या लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे. या कारवाईला प्रत्युत्तर दिले जाईल, अशी वल्गना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केली आहे. त्यानंतर लगेचच अमेरिकेची कडक प्रतिक्रिया आली आहे. भारताच्या या कारवाईचे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने जोरदार समर्थन केले आहे. भारताच्या हल्ल्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्याचा विचार करू नका. पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध करण्याचे धाडस करू नये. दहशतवाद्यांवर कारवाई करण्याचा आणि त्यांचे अड्डे नष्ट करण्याचा पूर्ण अधिकार भारताला आहे. त्यामुळे पाकिस्तानने भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणताही हल्ला न करण्याची योजना आखावी, अशी सूचना रुबियो यांनी केली आहे.
यासोबतच, पाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देण्याचा इशारा देत असताना, रुबियो यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा करून त्यांना शांत राहण्यास बजावले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे सरकार आणि तेथील लष्कर आणखी दबावाखाली आले आहे.
भारताने केलेल्या हल्ल्यानंतर मार्को रुबियो यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट टाकली की, आम्ही भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. अमेरिकेला आशा आहे की, उभय देशांत निर्माण झालेला तणाव लवकरात लवकर निवळेल. शांततापूर्ण तोडग्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाने प्रयत्न करावेत, अशी आमची धारणा आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील वैयक्तिक मैत्री अतिशय महत्त्वाची ठरली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर अमेरिका आपली बाजू घेऊन भारताला इशारा देईल, अशी पाकिस्तानची धारणा होती. प्रत्यक्षात अमेरिकेने भारताला भरभरून पाठिंबा देऊन पाकिस्तानला चपराक लगावली आहे.मार्को रुबियो