Operation Sindoor - Pakistan & Karachi Share Market Crash Pudhari
आंतरराष्ट्रीय

Operation Sindoor: पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळला; भारतीय स्ट्राईकमुळे कराची बाजार रक्तबंबाळ

Operation Sindoor: पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला जबर फटका; कराची बाजारात 6000 हून अधिक अंकांची घसरण

Akshay Nirmale

Operation Sindoor impact on Pakistan share market and Karachi Share Market

कराची/नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले. भारताच्या या 'ऑपरेशन सिंदूर'चा जबरदस्त तडाखा पाकिस्तानच्या भूमीसह पाकिस्तानच्या शेअर मार्केटलाही बसला.

पाकिस्तानच्या शेअर बाजारात बुधवारी सकाळी प्रचंड मोठी घसरण नोंदवली गेली. कराची शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक KSE-100 तब्बल 6272 अंकांनी म्हणजेच 5.5 टक्क्यांनी घसरला. या घसरणीनंतर निर्देशांक 113568.51 वरून थेट 107296.64 या पातळीवर आला.

23 एप्रिल ते 5 मे या काळात कराची निर्देशाकांची घसरगुंडी

23 एप्रिल ते 5 मे या कालावधीत कराची स्टॉक एक्स्चेंजचा बेंचमार्क KSE-100 निर्देशांक 3.7 टक्क्यांनी घसरला आहे. भारत लष्करी कारवाई करेल या भीतीने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले होते. गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती.

मंगळवारी 6 एप्रिल रोजी रात्री भारताने केलेल्या हल्ल्यानंतर त्याचे थेट पडसाद कराची आणि पाकिस्तान शेअर बाजारात उमटले.

पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या शेअर बाजारात आधीच 3.7 टक्के घसरण झाली होती, जी ऑपरेशन सिंदूरनंतर अधिक गडद झाली. याउलट भारतातील सेन्सेक्स निर्देशांकात याच कालावधीत 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.

भारताचा शेअर बाजार स्थिरतेकडे

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नव्याने उफाळलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार तुलनेने स्थिरता दर्शवत आहे. सेन्सेक्सने सुरुवातीला 692 अंशांची घसरण होऊन 80641.07 वरून 73948.80 या पातळीवर मजल मारली होती.

मात्र त्यानंतर झपाट्याने सावरत 200 पेक्षा अधिक अंशांची वाढ नोंदवून तो 80845 वर पोहोचला.

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्समध्ये फक्त 32 अंशांची (0.04 टक्के) घसरण होती आणि तो 80609 वर व्यवहार करत होता. त्याच वेळी निफ्टी 50 निर्देशांकात 19 अंशांची (0.08 टक्के) घसरण नोंदवली गेली असून तो 24361 वर स्थिर होता.

यापुर्वीचे भौगोलिक तणाव आणि भारतीय शेअर मार्केटची स्थिती

ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानातील शेअर मार्केट अस्थिरता निर्माण झालेली असताना भारतात मात्र त्याची झळ बसलेली दिसत नाही. दीर्घकालीन दृष्टीने भारतीय शेअर बाजार नेहमीच सावरलेला आहे.

  • कारगिल युद्धानंतर सेन्सेक्समध्ये एका वर्षात 63 टक्क्यांची वाढ झाली.

  • संसदेवरील हल्ल्यानंतर पुढील वर्षी 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली.

  • मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर 12 महिन्यांत सेन्सेक्सने 60 टक्क्यांनी वाढ केली.

  • बालाकोट एअर स्ट्राईकनंतर वर्षअखेरीस 15 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.

'ऑपरेशन सिंदूर' : भारताची प्रतिहल्ल्याची कारवाई

22 एप्रिल रोजी झालेल्या पाहीलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवाद्यांच्या नऊ तळांवर अचूक क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईचे कोडनाव होते 'ऑपरेशन सिंदूर'.

भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल या तिन्ही संरक्षण दलांनी समन्वयाने ही कारवाई केली. ही कारवाई मंगळवारी रात्री 1.44 वाजता करण्यात आली. यामध्ये पाकिस्तानात चार आणि PoK मध्ये पाच टार्गेट्स नष्ट करण्यात आले.

दहशतवादी गटांवर लक्ष्यबद्ध हल्ला

भारतीय गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईत जैश-ए-मोहम्मद (JeM) चे 4, लष्कर-ए-तोयबा (LeT) चे 3 आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) चे 2 तळ उद्ध्वस्त करण्यात आले.

भारतात नागरी संरक्षण सराव

गौरवाची बाब म्हणजे, भारताने आजच देशभरात 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षण सराव आयोजित केला होता. यामध्ये हवाई हल्ला सायरन, बचाव कार्य, ब्लॅकआउट सराव आणि छुपवणूक कार्यवाही यांचा समावेश आहे.

भारताची धोरणात्मक पावले

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधू जल करार स्थगित केला असून पाकिस्तानच्या नागरिकांना दिलेली सर्व व्हिसा परत घेतली आहेत. तसेच पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांना "persona non-grata" घोषित करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT