

Moody's Report on Pakistan
नवी दिल्ली/इस्लामाबाद : जम्मू आणि काश्मीरच्या सीमांवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत असताना, आंतरराष्ट्रीय क्रेडिट रेटिंग संस्था मूडीज (Moody’s) ने पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
मूडीजच्या अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या अशा स्थितीत नाही की ती भारतासोबत युद्धाचा मोठा खर्च पेलू शकेल. त्यामुळे पाकिस्तानला भारतासोबत युद्ध परवडणारे नाही. पाकिस्तानची अवस्था भिकेकंगाल होऊ शकते, असे मूडीजने म्हटले आहे.
मूडीजच्या विश्लेषकांनी नमूद केले आहे की, पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या प्रचंड दबावाखाली असून, युद्धाचे आर्थिक दुष्परिणाम सहन करण्याची त्याची क्षमता नाही. सध्या पाकिस्तानकडे आंतरराष्ट्रीय कर्ज फेडण्यासाठी आवश्यक इतके परकीय चलनातील राखीव रक्कम देखील नाही.
राजकीय अस्थिरतेचा फटका
पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून सतत महागाई, कोरोनानंतरची पुनर्बांधणी, रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम आणि स्थानिक राजकीय अस्थिरतेचा सामना करत आहे. त्यामुळे पाकच्या अर्थव्यवस्थेचा कणा खचला आहे.
डिसेंबर 2024 अखेर पाकिस्तानवर 131 अब्ज डॉलहून अधिक परकीय कर्ज आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये (FY23 आणि FY24) त्यांनी IMF कडून 3 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम उचलली आहे. यावरून देशाची आर्थिक अस्थिरता स्पष्ट होते.
पाकिस्तानकडे सध्या खूप कमी परकीय चलन साठा आहे. तो इतकाच आहे की केवळ तीन महिन्यांच्या आयात खर्चासाठी पुरेल. अशा स्थितीत युद्धाचा वाढीव खर्च पाकिस्तानला आणखी आर्थिक संकटात टाकू शकतो.
पाकिस्तानला अलीकडेच चीनने 2 अब्ज डॉलरचे कर्ज दिले आहे. त्याची मुदत वाढवली आहे. जर आर्थिक स्थिती आणखी बिघडली, तर हे कर्ज फेडणे पाकिस्तानसाठी अशक्य होईल, आणि परिणामी चीनलाही वित्तीय फटका बसेल.
मूडीजच्या म्हणण्यानुसार, सीमेवरील तणाव अधिक काळ टिकला, तर पाकिस्तानच्या बाह्य आर्थिक मदतीवर परिणाम होऊ शकतो. गुंतवणूकदार आणि आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था अशा अस्थिर देशांमध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत.
दरम्यान, याच काळात भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था ठरली आहे.
2024 मध्ये पाकिस्तानने भारताकडे केलेला व्यापार भारताच्या एकूण निर्यातीपेक्षा 0.5 टक्क्यांहून कमी होता. त्यामुळे सीमेवरील तणावाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही, असेही मूडीजने स्पष्ट केले.
मात्र, संरक्षण खर्च वाढल्यास भारताच्या आर्थिक तुटीवर आणि वित्तीय नियोजनावर काहीसा ताण येऊ शकतो, असेही मूडीजच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानने युद्धाचा मार्ग न निवडता शांततेच्या दिशेने पावले टाकावीत, अशी अप्रत्यक्ष सूचना मूडीजच्या या विश्लेषणातून दिसून येते. आर्थिक दृष्टिकोनातून पाकिस्तानसाठी युद्ध हे घातक पाऊल ठरू शकते.