Helle Lyng PM Modi Pudhari
आंतरराष्ट्रीय

Helle Lyng PM Modi: मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेच्या महिला पत्रकाराचे इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड

Helle Lyng Instagram Suspended: पंतप्रधान मोदींना नॉर्वेमध्ये प्रश्न विचारणाऱ्या पत्रकार हेल लिंग यांनी इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड झाल्याचा दावा केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Helle Lyng Instagram Facebook Accounts Suspended: पंतप्रधान नरेंद्र मोदींना नॉर्वेमध्ये प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केल्यानंतर चर्चेत आलेल्या पत्रकाराने आता मोठा दावा केला आहे. पत्रकार हेल लिंग यांनी आपले इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

नेमकं काय घडलं?

नॉर्वेमधील संयुक्त मीडिया संवादादरम्यान पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करताना हेल लिंग अचानक चर्चेत आल्या होत्या. मोदी पत्रकार परिषदेतून बाहेर पडत असताना त्यांनी मोठ्याने विचारलं, “जगातील सर्वात मुक्त प्रसारमाध्यमांपैकी एक असलेल्या देशाच्या पत्रकारांचे प्रश्न का घेत नाही?” हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या.

Helle Lyng

‘प्रेस फ्रीडमसाठी छोटी किंमत’

यानंतर हेल लिंग यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत दावा केला की, दिवसभर इंस्टाग्राम अकाउंट वापरता आलं नाही आणि नंतर ते सस्पेंड झालं.

“प्रेस फ्रीडमसाठी ही छोटी किंमत आहे. पण माझ्यासोबत असं याआधी कधी झालं नव्हतं,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं. त्यांनी सस्पेन्शन नोटीसचाही स्क्रीनशॉट शेअर केला.

Helle Lyng

यानंतरच्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी फेसबुक अकाउंटही सस्पेंड झाल्याचं सांगितलं. “माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक भारतीयांना उत्तर द्यायचं होतं. पण आता उत्तरं उशिरा मिळतील. माझी अकाउंट्स पुन्हा सुरू होतील, अशी आशा आहे,” असं त्यांनी लिहिलं.

भारताच्या प्रेस फ्रीडमवर टिप्पणी

या वादानंतर हेल लिंग यांनी आपल्या कृतीचं समर्थन करत पुन्हा पोस्ट केली. त्यांनी नॉर्वे आणि भारताच्या प्रेस फ्रीडम इंडेक्सचा उल्लेख करत, नॉर्वे पहिल्या क्रमांकावर तर भारत 157व्या क्रमांकावर असल्याचं म्हटलं. हेल लिंग या ओस्लोस्थित Dagsavisen या वृत्तपत्रात कार्यरत आहेत.

भारतीय दूतावासाकडून निमंत्रण

या वादानंतर नॉर्वेमधील भारतीय दूतावासाने हेल लिंग यांना स्वतंत्र मीडिया ब्रिफिंगसाठी आमंत्रित केल्याचंही समोर आलं. त्या संवादात त्यांनी भारताच्या विश्वासार्हता आणि मानवाधिकारांबाबत प्रश्न उपस्थित केले.

यावर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी भारताचा ऐतिहासिक वारसा, बुद्धिबळ, योग आणि कोविड काळातील लस मदत यांचा उल्लेख करत भारताची भूमिका स्पष्ट केली.

सोशल मीडियावर टीका आणि समर्थन

या प्रकरणानंतर सोशल मीडियावर हेल लिंग यांच्यावर जोरदार टीका झाली. काहींनी त्यांना “परदेशी एजंट”, “गुप्तहेर” किंवा “चीन समर्थक” असे आरोप केले. तर काहींनी हा संयुक्त मीडिया संवाद होता, औपचारिक पत्रकार परिषद नव्हती, असा युक्तिवाद केला.

दरम्यान, हेल लिंग यांनी आणखी एका पोस्टमध्ये स्पष्टीकरण देत म्हटलं, “मी कोणत्याही सरकारसाठी काम करणारी गुप्तहेर नाही. मी एक पत्रकार आहे.”

विशेष म्हणजे, या वादानंतर त्यांच्या X अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या काहीशेवरून थेट 45 हजारांहून अधिक वाढल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT