स्टॉकहोम : स्टॉकहोम : कारोलिंस्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेंब्लीने २०२६ चे वैद्यकशास्त्रातील (Physiology or Medicine) नोबेल पारितोषिकाची घोषणा सोमवारी (दि. ५) करण्यात आली. यंदाचा हा सर्वोच्च बहुमान कार्ल डिसेरोथ (स्टॅनफोर्ड विद्यापीठ व हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूट, अमेरिका), पीटर हेगेमन (हम्बोल्ट विद्यापीठ, बर्लिन, जर्मनी) आणि जॉर्ज नागेल (वुर्जबुर्ग विद्यापीठ, जर्मनी) या तीन संशोधकांना संयुक्तपणे जाहीर झाला आहे.
‘लाइट-गेटेड आयन चॅनल्स’ (light-gated ion channels) आणि ‘ऑप्टोजेनेटिक्स’ (optogenetics) संदर्भातील शोधांसाठी त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
मानवी मेंदू भावना, स्मरणशक्ती, मानवी वर्तन आणि शरीराच्या विविध क्रिया कशा नियंत्रित करतो, हे विज्ञानासाठी शतकानुशतके एक न उलगडलेले कोडे राहिले होते. विसाव्या शतकात संशोधकांनी मेंदूचे कोणते भाग कोणत्या कार्यावर परिणाम करतात याचा अभ्यास सुरू केला होता; मात्र त्या पद्धतींमुळे मेंदूच्या रचनेत आणि त्याच्या वर्तनात थेट कार्यकारणभाव (causal relationships) सिद्ध करता येत नव्हता. त्यामुळे मेंदूची तत्कालीन प्रतिमा अनेक शंका आणि प्रश्नांनी भरलेल्या एका रूपरेषेसारखी होती.
परंतु, या तिन्ही शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या 'ऑप्टोजेनेटिक्स' या पद्धतीमुळे जिवंत मेंदूतील मज्जापेशी (nerve cells) स्मरणशक्ती, भावना आणि वर्तनाला नेमके कसे आकार देतात, हे थेट दाखवणे शक्य झाले आहे.
"ज्या प्रकारे मेंदूचा अचूक नकाशा तयार करण्याचे स्वप्न आपण एकेकाळी फक्त पाहू शकत होतो, ते प्रत्यक्षात आणण्याची संधी ऑप्टोजेनेटिक्सने उपलब्ध करून दिली आहे," असे नोबेल समितीचे अध्यक्ष पर स्वेनिंगसन (Per Svenningsson) यांनी स्पष्ट केले आहे.
या क्रांतिकारी संशोधनाचा पाया पीटर हेगेमन यांच्या कुतूहलातून रचला गेला. 'क्लॅमिडोमोनास' (Chlamydomonas) नावाचे एकपेशीय शेवाळ प्रकाशाच्या दिशेने कसे पोहते, याविषयी त्यांना उत्सुकता निर्माण झाली होती.
प्रथिनाचा शोध : २००० च्या दशकाच्या सुरुवातीला पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांनी शेवाळाच्या पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे ‘चॅनेलरॉडॉप्सिन’ (channelrhodopsin) हे वैशिष्ट्यपूर्ण प्रथिन शोधून काढले.
प्रकाशाची संवेदनशीलता : या प्रथिनावर निळा प्रकाश पडताच त्यातील मार्ग (channel) उघडतो आणि भारित आयन (charged ions) पेशीमध्ये वाहू लागतात, ज्यामुळे एक विद्युत आवेग (electrical impulse) निर्माण होतो.
वैशिष्ट्य : हे प्रथिन ज्या कोणत्याही पेशीमध्ये अंतर्भूत केले गेले, त्या सर्व पेशी प्रकाशाप्रति संवेदनशील बनल्याचे संशोधकांना आढळले.
शेवाळातील या शोधाचा वापर पुढे कार्ल डिसेरोथ यांनी मेंदूच्या विज्ञानासाठी केला.
उंदरांच्या मज्जापेशींवर प्रयोग : डिसेरोथ यांनी चॅनेलरॉडॉप्सिनच्या जनुकाचा समावेश उंदरांच्या मज्जापेशींमध्ये केला.
संकेत सक्रिय करणे : केवळ निळा प्रकाश टाकून मज्जापेशींमधील संकेत (nerve signals) सक्रिय करण्यात त्यांना यश आले आणि हा महत्त्वाचा टप्पा त्यांनी २००५ मध्ये प्रसिद्ध केला.
जिवंत मेंदूवर नियंत्रण : यानंतर अवघ्या दोन वर्षांत, म्हणजेच २००७ मध्ये, त्यांनी जिवंत उंदरांच्या मेंदूत प्रकाशाच्या मदतीने मज्जापेशींचे कार्य नियंत्रित करणारा हा ‘स्विच’ यशस्वीरीत्या कार्यान्वित करून दाखवला.
प्रकाशाच्या सहाय्याने नर्व्ह सिग्नल्स नियंत्रित करण्याच्या या तंत्रज्ञानाने जगभरात प्रचंड प्रभाव निर्माण केला आहे.
मानसिक व मज्जासंस्थेच्या आजारांवर संशोधन: विविध न्यूरोलॉजिकल आणि मानसिक विकारांशी संबंधित असलेल्या स्मरणशक्ती, भावना आणि वर्तनावर नियंत्रण ठेवणारी मेंदूतील मज्जातंतूंची गुंतागुंतीची जाळी (neural circuits) उलगडण्यासाठी याचा वापर केला जात आहे. दृष्टीदोष निवारणाचे प्रयत्न: प्रत्यक्ष वैद्यकीय उपचारांमध्ये (clinical medicine), दृष्टीदोष किंवा अंधत्व असलेल्या व्यक्तींची दृष्टी पूर्ववत करण्यासाठीही या पद्धतीचा वापर करण्याचे महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
१. कार्ल डिसेरोथ (Karl Deisseroth)
त्यांचा जन्म १९७१ मध्ये झाला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून १९९८ मध्ये पीएच.डी. आणि २००० मध्ये एम.डी. पदवी पूर्ण केली. सध्या ते हॉवर्ड ह्यूजेस मेडिकल इन्स्टिट्यूट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात बायोइंजिनिअरिंग व सायकियाट्री अँड बिहेव्हिरल सायन्सेसचे प्राध्यापक (D.H. Chen Professor) म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा जन्म १९५४ मध्ये झाला. त्यांनी १९८४ मध्ये जर्मनीतील मार्टिन्सरीड येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्रीमधून पीएच.डी. पदवी मिळवली. ते सध्या हम्बोल्ट विद्यापीठ, बर्लिन येथे न्यूरोसायन्सचे हर्टी सीनियर प्राध्यापक आहेत. या पुरस्कारासाठी निवडलेला मूळ शोध त्यांनी मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोकेमिस्ट्री येथे लावला होता.
त्यांचा जन्म १९५३ मध्ये झाला. त्यांनी १९८८ मध्ये जर्मनीतील फ्रँकफर्ट विद्यापीठातून पीएच.डी. संपादन केली. ते सध्या वुर्जबुर्ग विद्यापीठात 'मॉलिक्युलर प्लांट फिजियोलॉजी अँड बायोफिजिक्स - बॉटनी १' विभागात प्राध्यापक आहेत. त्यांनी हा शोध फ्रँकफर्ट येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर बायोफिजिक्स येथे लावला होता.
या तिन्ही शास्त्रज्ञांना १ कोटी २० लाख स्वीडिश क्रोनोर (११.५२ कोटी रुपये) इतकी रोख पुरस्कार रक्कम संयुक्तपणे समान विभागून दिली जाईल.