यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना आज (दि. १२) जाहीर झाला आहे. Nobel X
आंतरराष्ट्रीय

Nobel Economics Prize 2026: रॉबर्ट हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर

समग्र अर्थशास्त्र स्थिरीकरणाचा सूक्ष्म आर्थिक पाया मजबूत करण्याच्या संशोधनाचा गौरव

पुढारी वृत्तसेवा

Nobel Economics Prize 2026 : यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना आज (दि. १२) जाहीर झाला. समग्र अर्थशास्त्र स्थिरीकरणाचा सूक्ष्म आर्थिक पाया मजबूत करण्याच्या त्यांच्या संशोधनाचा गौरव करण्यात आला आहे. रॉबर्ट हॉल कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत तर मायकेल वूडफोर्ड हे न्यू यॉर्कमधील कोलंबिया युनिव्हर्सिटीत कार्यरत आहेत. स्टॉकहोम येथील 'रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस'ने या प्रतिष्ठेच्या पुरस्काराची घोषणा केली.

'आर्थिक धक्क्यांचा अधिक सक्षमपणे सामना करण्याचे बळ'

पुरस्कार समितीचे अध्यक्ष जॉन हॅसलर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "या दोन्ही संशोधकांच्या कार्यामुळे जगातील मध्यवर्ती बँका आणि सरकारे वापरत असलेल्या आर्थिक प्रारूपांना (मॉडेल्स) एक भक्कम सैद्धांतिक पाया मिळाला आहे. ऊर्जा संकट असो वा कुटुंबाच्या खपातील अचानक झालेले बदल, अशा आर्थिक धक्क्यांचा सामना करण्यासाठी त्यांच्या या संशोधनामुळे आपण अधिक सक्षम बनलो आहोत."

पुरस्कार १० डिसेंबर रोजी होणार प्रदान

अर्थशास्त्रातील या पुरस्काराचे औपचारिक नाव 'अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृत्यर्थ बँक ऑफ स्वीडन प्राइज इन इकॉनॉमिक सायन्सेस' असे आहे. स्वीडनच्या मध्यवर्ती बँकेने १९६८ मध्ये डायनामाइटचे शोधक आणि नोबेल पुरस्कारांचे संस्थापक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ या पुरस्काराची सुरुवात केली होती. नोबेल परंपरेनुसार, तांत्रिकदृष्ट्या हा मूळ नोबेल पुरस्कार नसला, तरी तो इतर नोबेल पुरस्कारांसोबतच १० डिसेंबर रोजी अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.

यंदाच्या नोबेल पुरस्काराचे स्वरूप १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर

गेल्या आठवड्यात वैद्यकशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रांतील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यंदाच्या नोबेल पुरस्काराचे स्वरूप १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर (सुमारे १२ लाख अमेरिकन डॉलर्स / १० कोटी रुपयांहून अधिक) असे असून, ही रक्कम विजेत्यांमध्ये समान विभागून दिली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT