Israel Lebanon Negotiation: अमेरिका-इराण शस्त्रसंधीबाबत आजपासून पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये चर्चा होणार आहे. पाकिस्तानने या शांती करारासाठी पुढाकार घेतल्यानं तो या भागातील एक शक्तीशाली देश म्हणून समोर येत असल्याची शेखी मिरवली जात होती. त्यातच आता इस्त्रायलच्या पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी पाकिस्तानला तगडा झटका दिला आहे.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहून यांनी गुरूवारी सांगितलं की त्यांनी त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांना लेबनॉनसोबत थेट वाटाघाटी लवकरात लवकर सुरू करण्यास सांगितले आहे. इराण-अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील शस्त्रसंधी ज्यावेळी इस्त्रायलने लेबनॉनमध्ये मोठी लष्करी कारवाई केल्यानं अडचणीत सापडली होती. त्यानंतर आता नेतान्याहूंनी थेट लेबनॉनशीच वाटाघाटी करणार असल्याचं सांगितल आहे. विशेष म्हणजे इस्त्रायलने यापूर्वीच पाकिस्तानची मध्यस्थ म्हणून भूमिका नाकारली आहे. पाकिस्तान हा विश्वासार्ह नाही अन् दहशतवाद पोसणारा शांतीसाठी वाटाघाटी कसा करू शकतो अशी शंका इस्त्रायली नेत्यांनी व्यक्त केली होती.
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, 'लेबनॉनच्या सततच्या विनंतीनंतर इस्त्रायल लेबनॉनशी थेट वाटाघाटी करणार आहे. मी काल माझ्या मंत्रीमंडळाला लेबनॉनसोबत जेवढ्या लवकर वाटाघाटी सुरू करणं शक्य आहे तेवढ्या लवकर त्या सुरू कराव्यात याबाबतचे निर्देश दिले आहेत.'
ते आपल्या वक्तव्यात पुढे म्हणतात, 'लेबनॉनसोबतच्या या वाटाघाटींचा फोकस हा हिजबुल्लाचे निःशस्त्रीकरण आणि इस्त्रायल-लेबनॉन यांच्यात शांतेतेचं नातं स्थापित करणं यावर असणार आहे. आज लेबनॉनच्या पंतप्रधानांनी बैरूतमधून लष्कर मागे घेण्याच्या निर्णयाचे इस्त्रायल स्वागत करते.'
असं असलं तरी इस्त्रायली अधिकाऱ्यांनी टाईम्स ऑफ इस्त्रायलला सांगितलं की जर लेबनॉनसोबत चर्चा सुरू झाली तरी आम्ही हिजबुल्लासोबत कोणतीही शस्त्रसंधी होणार नाही. दरम्यान, अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने सांगितलं की इस्त्रायल आणि लेबनॉन यांच्यातील चर्चा पुढच्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये सुरू होईल. १९४८ मध्ये जेव्हा इस्त्रायलची निर्मिती झाली त्यावेळीपासून तांत्रिकदृष्ट्या इस्त्रायल आणि लेबनॉन हे एकमेकांसोबत युद्धातच आहेत.
दरम्यान, लेबनॉनने किमान २४ तासाची शस्त्रसंधी करण्यात यावी जेणेकरून इस्त्रायलसोबत सीमेवर चर्चा करता येईल यासाठी आग्रह धरला आहे. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने लेबनॉनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं दिलं आहे. अधिकाऱ्याने सांगितलं की ही एक वेगळी मात्र अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराच्या धाटणीची संधी असेल.
नेतान्याहूंचे हे वाटाघाटी करण्याचे वक्तव्य इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या सर्वात मोठ्या एअर स्ट्राईक नंतर आलं आहे. या हल्ल्यात जवळपास ३०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, इराणने कोणत्याही शस्त्रसंधीच्या करारात लेबनॉनला समाविष्ट करून घेतलं पाहिजे अशी भूमिका मांडली होती. तर अमेरिका आणि इस्त्रायलने लेबनॉन हा सुरूवातीच्या करारात समाविष्ट नव्हता अशी भूमिका घेतली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहूंना फोन करून लेबनॉवरील हल्ले कमी करण्यास सांगितलं होतं. त्यांनी इराणसोबतची चर्चा धोक्यात टाकू नका असे देखील सांगितल्याचं वृत्त एनबीसी न्यूजने दिले होते.
मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की नेतान्याहूंनी लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवण्याची पाठराखण केल्यानंतर ट्रम्प यांनी हा कॉल केला होता.
दुसरीकडे इराणने इस्त्रायलने कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. त्यांनी लेबनॉन हा शस्त्रसंधी कराराचा एक महत्वाचा मुद्दा आहे.