

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : युद्धविरामानंतरही सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे अमेरिका-इराणदरम्यान चर्चा होत आहे. चर्चेच्या पार्श्वभूमीवर, सुरक्षेचा उपाय म्हणून पाकिस्तान सरकारने 9 आणि 10 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या काळात केवळ रुग्णालये, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असेल.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन शिष्टमंडळाचे नेतृत्व उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स करणार आहेत. त्यांच्यासोबत विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई व ज्येष्ठ सल्लागार जॅरेड कुशनर उपस्थित राहतील. इराणच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व संसदेचे सभापती मोहम्मद बगेर कालीबाफ करण्याची शक्यता आहे. मात्र, या शिष्टमंडळात इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रतिनिधी आणि परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांचा समावेश असेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि उपपंतप्रधान तथा परराष्ट्र मंत्री इशाक दार या चर्चेचे यजमानपद भूषवतील. फील्ड मार्शल असीम मुनीर यांचा या चर्चेतील सहभाग अद्याप अस्पष्ट असला तरी, युद्धविरामाच्या घोषणेपर्यंत झालेल्या वाटाघाटींमध्ये मुनीर यांचा मोठा सहभाग असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
युद्धविरामात आमचाही समावेश करा ः लेबनॉनची मागणी
इस्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे, लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी शाहबाज शरीफ यांना इराण युद्धविरामात लेबनॉनचाही समावेश असल्याची पुष्टी करण्याचे आवाहन केले आहे. इस्रायली हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आमचाही यात समावेश करावा, अशी मागणी या देशाने केली आहे.
होर्मुझमधून दररोज केवळ 15 जहाजांनाच परवानगी ः इराण
युद्धविरामाच्या काळात होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून दररोज जास्तीत जास्त 15 जहाजेच प्रवास करू शकतील. याचा अर्थ पूर्वीच्या तुलनेत जहाजांची ये-जा मोठ्या प्रमाणावर मर्यादित करण्यात आली आहे. यासोबतच इराणने काही अटीही घातल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने इराणचा गोठवलेला (फ्रीज केलेला) निधी त्वरित परत करावा आणि युद्ध समाप्तीच्या कराराला संयुक्त राष्ट्रात अधिकृत मान्यता मिळवून द्यावी.