Pakistan flash flood death
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने कहर केला असून, केवळ 48 तासांत 320 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक जिल्ह्यांत पूराने थैमान घातले आहे. यामध्ये रस्ते, पूल, इमारती, तसेच विद्युत यंत्रणा पूर्णतः ध्वस्त झाल्या आहेत. AFP ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळून 5 मृत्यू
खैबर पख्तुनख्वा राज्यात सुरू असलेल्या बचाव कार्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी पाठवलेले हेलिकॉप्टर कोसळले आणि त्यात दोन वैमानिकांसह पाच जणांचा मृत्यू झाला. सुमारे 60 हून अधिक जण या घटनेत जखमी झाले असून, अनेकजण अद्याप बेपत्ता आहेत.
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (PDMA) च्या माहितीनुसार, स्वात जिल्ह्यात 7 घरे पूर्णपणे नष्ट झाली असून 38 घरे मोठ्या प्रमाणावर नुकसानग्रस्त झाली आहेत. याशिवाय, तीन शाळा पूर्णतः उद्ध्वस्त झाल्या असून आणखी तीन शाळांना मोठे नुकसान झाले आहे.
बुनर जिल्ह्यात सर्वाधिक 91 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर स्वातमध्ये 26 घरे, तीन शाळा आणि आठ इतर सार्वजनिक इमारती कोसळल्या आहेत.
गिलगिट-बाल्टिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्येही जीवितहानी
गिलगिट-बाल्टिस्तान भागात 5 जणांचा व पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला आहे. हे भाग देखील जोरदार पावसाने बाधित झाले आहेत.
दुर्गम भागांत मदत पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. मात्र, खराब हवामान व तुटलेले रस्ते यामुळे मदतकार्य खंडित होत आहे. रेस्क्यू टीमचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल यांनी सांगितले की, आतापर्यंत 157 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, 100 हून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. मात्र, संचार सुविधा ठप्प असल्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.
खैबर सरकारने पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 50 कोटी पाकिस्तानी रुपये मदतीचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान, 21 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
खैबर पख्तुनख्वा राज्यात पूरग्रस्त मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह खुले मैदानात ठेवण्यात आले असून, तिथे सार्वजनिक प्रार्थनेनंतर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ही दृश्ये अतिशय हृदयद्रावक आहेत.
दक्षिण आशियामध्ये गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली आहे. हवामान बदल हा यामागील प्रमुख कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
पाकिस्तानसारखे देश या हवामान बदलाच्या परिणामांना अधिक संवेदनशील आहेत. यंदाच्या जुलै महिन्यात, पंजाबमध्ये सरासरीच्या तुलनेत 73 टक्के अधिक पाऊस झाल्याचे नोंदले गेले आहे.
पुरामुळे कमकुवत व जुने घर कोसळणे, विद्युत शॉक लागणे, तसेच नदीकाठावर केलेली अतिक्रमणे ही मोठ्या प्रमाणावर मृत्यूंची कारणे ठरत आहेत. योग्य ड्रेनेज प्रणालीचा अभाव व नागरी भागात नियोजनशून्य विकासामुळे ही स्थिती गंभीर होत आहे.