

Air Canada perations suspended flight attendants strike employee walkout labour dispute
ओटावा : कॅनडाच्या Air Canada या प्रमुख विमान कंपनीने सर्व विमानसेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्या असून यामागचे कारण म्हणजे कंपनीतील 10,000 हून अधिक विमानसेविका (Flight Attendants) संपावर गेल्या आहेत. या संपामुळे शनिवारपासून संपूर्ण जगभरात अंदाजे 1.3 लाख प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम झाला आहे, ज्यात 25,000 हून अधिक कॅनडियन प्रवासी परदेशात अडकले आहेत.
कॅनेडियन युनियन ऑफ पब्लिक एम्प्लॉईज (CUPE) या संघटनेने सांगितले की, Air Canada ने मंगळवारपासून वेतन व अर्धपगारी वेळेबाबत चर्चेला प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी कंपनीने सरकार-निर्देशित मध्यस्थीची मागणी केली होती, जी संघटनेने नाकारली. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 12.58 वाजता अधिकृत संपाची घोषणा झाली.
कंपनीने चार वर्षांत 38 टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव दिला होता. पण यातील पहिल्या वर्षातील फक्त 8 टक्के वाढ संघटनेला अपुरी वाटली, विशेषतः महागाईच्या पार्श्वभूमीवर.
Air Canada आणि Air Canada Rouge या दोन्ही सेवा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, Air Canada Express ही सेवा, जी इतर तृतीय पक्ष विमान कंपन्यांमार्फत चालवली जाते, ती पूर्ववत सुरू राहणार आहे.
कॅनडाच्या फेडरल जॉब्स मंत्री पट्टी हाजदु यांनी दोन्ही बाजूंना चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "कॅनेडियन जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दोन्ही पक्षांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत."
Montreal येथील 21 वर्षीय प्रवाशाने युरोप दौऱ्यासाठी 8000 डॉलर खर्च करून नॉन-रिफंडेबल तिकिट घेतले होते, परंतु आता त्याची Nice (France) येथील फ्लाईट रद्द झाली आहे. त्याने याबाबत संताप व्यक्त केला. एका वृत्तसंस्थेला त्याने सांगितले की, "सुरुवातीला मी निराश झालो होतो, पण आता मला कर्मचाऱ्यांची बाजू समजते."
Air Canada ने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी विमानतळावर येऊ नये, जर त्यांचे Air Canada किंवा Rouge चे कन्फर्म तिकिट नसेल. रद्द झालेल्या फ्लाइटसंबंधी ग्राहकांना सूचना दिल्या जातील.
प्रवाशांना पर्यायी विमान कंपन्यांमार्फत पुनर्बुकिंग, फ्युचर क्रेडिट, किंवा पूर्ण रिफंड दिला जाईल. अधिक माहितीसाठी aircanada.com/action या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या संपामुळे कॅनडामधील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील हजारो प्रवाशांचे नियोजन बिघडले आहे. कंपनी आणि संघटनेत लवकर तोडगा निघावा, हीच सर्वांची अपेक्षा आहे. दरम्यान, प्रवाशांनी अपडेट्ससाठी कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर नजर ठेवावी.