Bangladesh first female Prime Minister Khaleda Zia death
ढाका : बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्षा आणि बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा झिया यांचे आज पहाटे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. दशकानुदशके देशाच्या राजकारणातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व असलेल्या झिया या शेख हसीना यांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी होत्या. २०२४ मधील देशव्यापी जनक्षोभामुळे देश सोडून जाण्यास भाग पडलेल्या शेख हसीना सध्या नवी दिल्लीत आश्रयाला आहेत.
खालिदा झिया गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी होत्या. ढाका येथील एव्हरकेअर हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्या गेल्या अनेक वर्षांपासून हृदयविकार, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्या, मधुमेह, फुफ्फुसाचे आजार, संधिवात आणि डोळ्यांशी संबंधित गंभीर आजारांशी झुंज देत होत्या. त्यांना पेसमेकर बसवण्यात आला होता आणि यापूर्वी त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रियाही झाली होती. लंडनमध्ये उपचार घेऊन ६ मे रोजी परतल्या होत्या.
१९५९ मध्ये त्यांचा विवाह झियाउर रहमान यांच्याशी झाला होता, जे पुढे १९७७ मध्ये बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष बनले. मात्र, १९८१ मध्ये लष्करी उठावात पतीची हत्या झाल्यानंतर खालिदा झिया यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ मध्ये त्यांनी 'बीएनपी'ची धुरा आपल्या हाती घेतली. १९९१ मध्ये त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा बहुमान मिळवला. त्यांनी १९९१ ते १९९६ आणि २००१ ते २००६ अशा दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले.
खालिदा झिया आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यातील राजकीय वैर संपूर्ण जगाला ठाऊक आहे. अनेक दशके या दोन्ही नेत्यांनी बांगलादेशच्या राजकारणावर आपली पकड कायम ठेवली. विशेष म्हणजे, ज्या शेख हसीना यांच्याशी त्यांचा संघर्ष सुरू होता, त्या हसीना यांना २०२४ मधील जनक्षोभामुळे देश सोडून सध्या भारतात आश्रय घ्यावा लागला आहे.
खालिदा झिया यांचे पुत्र तारिक रहमान हे १७ वर्षांच्या वनवासानंतर नुकतेच लंडनहून बांगलादेशात परतले आहेत. देशात आगामी निवडणुकांची तयारी सुरू असतानाच झिया यांचे निधन झाल्याने 'बीएनपी' समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे.