

मॉस्को/कीव्ह; वृत्तसंस्था : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग दरम्यान असलेल्या निवासस्थानावर युक्रेनने 91 ड्रोन हल्ले केल्याचा खळबळजनक दावा रशियाने सोमवारी केला. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी ही माहिती दिली असून, या हल्ल्यानंतर रशिया आता युक्रेनवर निश्चित ठिकाणामवर हल्ले करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शांतता प्रक्रियेला मोठी खीळ बसणार आहे.
लावरोव्ह यांच्या हवाल्याने रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, 28 आणि 29 डिसेंबरच्या दरम्यान युक्रेनने 91 लांब पल्ल्याच्या ड्रोनद्वारे नोव्हगोरोड प्रदेशातील पुतीन यांच्या अधिकृत निवासस्थानाला लक्ष्य केले. मात्र, रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने हे सर्व ड्रोन पाडले असून यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे रशियाने म्हटले आहे. लावरोव्ह पुढे म्हणाले की, या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रशियाने युक्रेनमधील काही लक्ष्य निश्चित केले असून, लवकरच तिथे प्रतिहल्ला केला जाईल.
हा वाद अशा वेळी समोर आला आहे जेव्हा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांच्याशी फोनवर सकारात्मक चर्चा केल्याचे बोलले जात आहे. ट्रम्प यांनी ही चर्चा फलदायी असल्याचे म्हटले होते. मात्र, एका बाजूला ट्रम्प यांच्याशी शांततेच्या गप्पा मारणे आणि दुसर्या बाजूला युक्रेनवर क्षेपणास्त्र हल्ले करून नागरिक व पायाभूत सुविधा नष्ट करणे, असा रशियाचा दुटप्पी चेहरा असल्याची टीका झेलेन्स्की यांनी केली आहे. पुतीन यांनी अलीकडेच दावा केला होता की, रशिया डॉनबास, झापोरिझिया आणि खेरसन प्रदेशांच्या मुक्ततेसाठी आपल्या योजनेनुसार यशस्वीपणे पुढे जात आहे.