Crime News Japan Twitter killer
टोकियो : जपानने शुक्रवारी एका आरोपीला फाशी दिली. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क करुन नऊ जणांची क्रूरपणे हत्या केली होती. यात आठ महिलांचा समावेश होता. जपानने जवळपास तीन वर्षांत फाशीची दिलेली शिक्षा ही पहिलीच घटना आहे. सदर सीरियल किलरने ८ महिलांना त्याच्या फ्लॅटवर बोलावून त्यांची हत्या केली होती. महिलांची हत्या केल्यानंतर तो त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करायचा आणि घरातच लपवून ठेवायचा. ३३ वर्षीय ताकाहिरो शिराइशी असे त्याचे नाव असून त्याला 'ट्विटर किलर' म्हटले जाते.
शिराइशीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आताचे एक्स) वर स्वतःचा 'मृत्यूसाठी मदत करणारा' व्यक्ती म्हणून उल्लेख केला होता. तो महिलांना त्याच्या अपार्टमेंटवर बोलावून गळा दाबून त्यांची हत्या करायचा. सोशल मीडियावर जीवन संपवण्याबाबत विचार व्यक्त केलेल्या एका २३ वर्षीय महिला बेपत्ता होण्याच्या प्रकरणाची पोलीस चौकशी करत होते. याचदरम्यान ऑक्टोबर २०१७ मध्ये टोकियोच्या बाहेर असलेल्या कानागावा प्रांतातील झामा शहरात पोलिसांनी शिराइशीच्या घराची झाडाझडती घेतली होती. तेव्हा शिराईशीच्या खोलीत तीन कूलर बॉक्स आणि पाच कंटेनर सापडले होते. ज्यात मानवी डोके आणि हाडे सापडली होती.
जपानी पब्लिक ब्रॉडकास्टर 'एनएचके' आणि 'टीव्ही असाही' यांनी न्यायालयीन कार्यवाहीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ९ पीडित हे १५ ते २६ वयोगटातील होते. या पीडितांनी ऑनलाइन पोस्टद्वारे, स्वतःला संपवून टाकण्याचा विचार व्यक्त केला होता. त्यानंतर शिराइशीने त्यांच्याशी सोशल मीडियाद्वारे संपर्क साधला आणि त्याने मदत करण्याचे आश्वासन देत त्यांना घरी बोलावून घेतले.
पोलिस तपासात असेही आढळून आले की त्याने पहिल्यांदा महिलांचे लैंगिक शोषण केले. नंतर त्यांची निर्दयीपणे हत्या केली. त्याने मृतदेहांचे तुकडे करून घरातच कूलर बॉक्समध्ये लपवून ठेवले होते. पीडितांमधील एका महिलेचा प्रियकर असलेल्या व्यक्तीही त्याच्या क्रूरतेचा बळी ठरला होता.
२०१७ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये शिराइशीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिराइशीच्या फाशीच्या शिक्षेला मंजुरी देणारे न्यायमंत्री केइसुके सुझुकी यांनी म्हटले आहे की, "समाजात दहशत निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांसाठी दोषीचा अत्यंत स्वार्थी हेतू लक्षात घेता त्यांनी काळजीपूर्वक पुराव्यांची तपासणी केली आणि फाशी देण्याचा निर्णय घेतला.' शिराइशीला टोकियो डिटेंशन हाऊसमध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली.