

Husband kills Wife in Sangli
सांगली : कौटुंबिक वादातून बांधकाम कामगार पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी बांबूने घाव घालून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. शिलवंती पिंटू पाटील (वय ३०, रा. राजर्षी शाहूनगर, विजयनगर, सांगली, मुळ रा. हुलजंती, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेनंतर पती पिंटू पाटील हा दोन लहान मुलांसह पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी संजयनगर पोलिसांची पथके सोलापूर जिल्ह्यात रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पिंटू पाटील हा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा असून तो काही वर्षापासून सांगलीत राहतो. तो मजुरीसह नवीन बांधकामाच्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत होता. मूळच्या नंदूर (जि. सोलापूर) येथील पण सध्या सांगलीतील हनुमाननगरमध्ये स्थायिक असलेल्या शिलवंती हिच्याशी पिंटू पाटीलचे लग्न झाले होते. दोघांना आठ व दहा वर्षांची दोन मुले आहेत. सध्या विजयनगर येथील राजर्षी शाहूनगरमध्ये रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. तिथे पिंटू व शिलवंती दोघे वॉचमन होते. बांधकामाच्या ठिकाणीच पत्र्याच्या शेडमध्ये ते राहत होते.
मागील काही दिवसांपासून दोघांत कौटुंबिक कारणावरून सतत भांडणे होत होती. या भांडणाला कंटाळून शिलवंती ही दि. १३ जूनरोजी घर सोडून निघून गेली. याबाबत त्याने संजयनगर पोलिसांत फिर्यादही दिली होती. शिलवंती ही पुण्याजवळ बहिणीकडे गेली होती. शनिवारी ती पतीकडे परत आली. गुरूवारी पहाटेच्या सुमारास पिंटूने लाकडी बांबूने शिलवंतीच्या डोक्यात घाव घालून तिचा खून केला. त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन तो पसार झाला. खुनाच्या घटनेचे वृत्त समजताच संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सूरज बिजली पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक विमला एम. यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या. शिलवंती हिची आई व भाऊ यांना पोलिसांनी घटनेची माहिती दिली. दोघेही घटनास्थळी येताच शिलवंतीचा मृतदेह पाहून हंबरडा फोडला.