Iran vs Israel war-ayatollah khomeini -benjamin netanyahu  Pudhari
आंतरराष्ट्रीय

Israel airstrikes on Iran | इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, 200 विमाने इराणमध्ये घुसली, लष्करप्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी, हुसेन सलामी ठार

Israel airstrikes on Iran | इस्रायलचे ऑपरेशन रायझिंग लायन, इराणमधील आण्विक-लष्कर केंद्रे उद्धवस्त, बदला घेण्याचा इराणचा इशारा

Akshay Nirmale

Israel's Operation Rising Lion Iran nuclear sites targeted General Mohammad Bagheri and Hossein Salami killed Iran vows retaliation

तेहरान : इस्रायलने इराणवर 'ऑपरेशन रायझिंग लायन' अंतर्गत मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले असून यामध्ये इराणचे सशस्त्र दलाचे प्रमुख जनरल मोहम्मद बाघेरी आणि इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख मेजर जनरल होसैन सलामी यांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणमधील प्रसिद्धीमाध्यमांनी दिली आहे.

200 विमाने इराणमध्ये घुसली...

या भीषण हल्ल्यात इराणच्या आण्विक आणि लष्करी केंद्रांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) च्या माहितीनुसार, तब्बल 200 हून अधिक लढाऊ विमानांचा वापर करून इराणमधील विविध ठिकाणी हल्ले करण्यात आले.

यामध्ये इराणचे आणीबाणी नियंत्रण कमांडरही ठार झाले आहेत. “या तिघांनाही आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा हिंसाचार घडवण्यात जबाबदार धरले जात होते. त्यांचा मृत्यू ही संपूर्ण जगासाठी एक दिलासा देणारी बाब आहे,” असे . IDF ने एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

तेहरानमध्ये स्फोट, इस्रायलमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर

इज्रायलच्या हल्ल्यानंतर इराणच्या राजधानीत तेहरानमध्ये जोरदार स्फोट झाले, आणि शहरभर धुराचे लोट दिसून आले. यानंतर इज्रायलचे संरक्षण मंत्री इस्राइल कात्झ यांनी संपूर्ण देशात विशेष आपत्कालीन स्थिती जाहीर केली आहे. शाळांना बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

IRGC ने दिली बदला घेण्याची धमकी

हल्ल्यानंतर इराणमध्ये संतापाची लाट उसळली असून देशभरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. दरम्यान, इस्लामिक रेव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने आपल्या निवेदनात म्हटले की, “हे हल्ले निष्फळ ठरणार नाहीत. इज्रायलने आता कठोर आणि दु:खद बदल्याची तयारी ठेवावी.”

इराणचे अणुबॉम्ब आमच्यासाठी अस्तित्वाचा धोका - पंतप्रधान नेतान्याहू

पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात म्हटले की, “इराणने इतकं समृद्ध युरेनियम तयार केलं आहे की ते नऊ अणुबॉम्ब तयार करू शकतं. हे आपल्या अस्तित्वासाठी धोका आहे. आम्ही डोळे झाकून राहू शकत नाही.” नेतान्याहू यांनी यापूर्वीच इशारा दिला होता की इराण अण्वस्त्रे तयार करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत.

अमेरिकेची भूमिका आणि ट्रम्प यांची प्रतिक्रिया

हल्ल्याच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये काँग्रेस सदस्यांशी संवाद साधत होते. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केलं की, “हा हल्ला इस्रायलने एकतर्फी घेतलेला निर्णय होता. अमेरिकेचा यामध्ये थेट सहभाग नाही. आमचा प्राथमिक उद्देश म्हणजे अमेरिकन सैन्य आणि दूतावास सुरक्षित ठेवणे.”

ट्रम्प यांनी यापूर्वी नेतान्याहू यांना शांत राहण्याचा सल्ला दिला होता आणि वाटाघाटींचा मार्ग निवडावा, असे म्हटले होते. पण तणाव वाढल्यामुळे इज्रायलने थेट कारवाई केली.

IAEA चा निर्णय आणि आण्विक धोका

या हल्ल्यापूर्वी IAEA (आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था) ने इराणविरोधात 20 वर्षांनंतर प्रथमच ठराव मंजूर केला होता, ज्यात त्यांनी निरीक्षकांशी सहकार्य न केल्याचा आरोप होता. त्यानंतर इराणने अधिक प्रगत यंत्रणा बसवून तिसरे युरेनियम संवर्धन केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली.

दरम्यान, दोनच दिवसांपुर्वी अमेरिका आणि इराणमध्ये न्यूक्लियर चर्चेवरून तणाव निर्माण झाला होता. ही चर्चा निष्फळ ठरली तर अमेरिकेच्या तळांवर हल्ले करू, असा इशारा इराणने दिला होता. तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ही चर्चा सुफळ होईल, याबाबत शंका व्यक्त केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT