Population File Photo
आंतरराष्ट्रीय

World largest religion: २०३५ पर्यंत इस्लाम जगातील सर्वात मोठा धर्म ठरणार; हिंदूंच्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज, पाहा अहवाल

२०३५ पर्यंत इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील सर्वात मोठा धर्म बनेल, असा महत्त्वपूर्ण अंदाज अमेरिकेतील नामांकित 'प्यू रिसर्च सेंटर'ने वर्तवला आहे.

मोहन कारंडे

World largest religion

वॉशिंग्टन : २०३५ पर्यंत इस्लाम धर्म ख्रिश्चन धर्माला मागे टाकून जगातील सर्वात मोठा धर्म बनेल, असा महत्त्वपूर्ण अंदाज अमेरिकेतील नामांकित 'प्यू रिसर्च सेंटर'ने वर्तवला आहे. दोन्ही धर्मांच्या लोकसंख्येत वाढ होत असली, तरी मुस्लिमांच्या लोकसंख्येतील वाढीचा दर लक्षणीयरीत्या अधिक आहे. तसेच जागतिक स्तरावर हिंदू आणि ज्यू लोकसंख्येत वाढ होणार असली, तरी एकूण जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत त्यांचा टक्का घटणार असल्याचेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

वाढत्या जन्मदराचा मुख्य प्रभाव

पीटीआयच्या वृत्तानुसार, या बदलाचे मुख्य कारण मुस्लिमांमधील उच्च प्रजनन दर हे असल्याचे अहवालात म्हटले आहे. २०२० ते २०२५ दरम्यान मुस्लिम महिलांचा प्रजनन दर प्रति महिला ३.१ बालके इतका होता, तर ख्रिश्चन महिलांमध्ये हा दर २.५ इतका नोंदवला गेला. इतर धर्मांतील महिलांचा सरासरी प्रजनन दर १.६ इतका असून, तो लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या २.१ या पातळीपेक्षा कमी आहे. २०२० मध्ये जगात २२७ कोटी ख्रिश्चन आणि २०२ कोटी मुस्लिम होते. २०३५ पर्यंत मुस्लिमांची संख्या २५७ कोटींवर, तर ख्रिश्चनांची संख्या २५२ कोटींवर पोहोचेल. हाच कल कायम राहिल्यास २०७० पर्यंत जगात ३६० कोटींहून अधिक मुस्लिम आणि सुमारे ३०० कोटी ख्रिश्चन असतील.

अमेरिका आणि कॅनडात ख्रिश्चन बहुसंख्य राहणार नाहीत

२०२० ते २०७० दरम्यान जगाची लोकसंख्या २९ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. या काळात केवळ मुस्लिम (८० टक्के वाढ) आणि ख्रिश्चन (३० टक्के वाढ) हे दोनच धर्म या वेगाशी सुसंगत राहतील. चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमधील घटत्या लोकसंख्येमुळे बौद्ध धर्मीयांची संख्या आणि प्रमाण दोन्ही कमी होईल. दुसरीकडे, सध्या अमेरिकेत ६२ टक्के असलेली ख्रिश्चन लोकसंख्या २०६५ पर्यंत ५० टक्क्यांच्या खाली येईल. कॅनडामध्ये तर २०३० पर्यंतच ख्रिश्चन अल्पसंख्याक ठरतील.

आफ्रिका ठरणार लोकसंख्या वाढीचे केंद्र

आगामी दशकांत जागतिक लोकसंख्या वाढीचे मुख्य केंद्र आफ्रिका खंड (विशेषतः सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडील भाग) असेल. २०७० पर्यंत जगातील निम्म्याहून अधिक ख्रिश्चन या भागात राहतील. अमेरिकेला मागे टाकून काँगो हा सर्वाधिक ख्रिश्चन लोकसंख्येचा देश बनेल (२७ कोटी). याउलट, युरोपची एकूण लोकसंख्या १७ टक्क्यांनी, तर तेथील ख्रिश्चन लोकसंख्या एक तृतीयांशने घटून ३२.४ कोटींवर येईल. मात्र, युरोपमधील मुस्लिमांचे प्रमाण ६ टक्क्यांवरून १३ टक्क्यांवर पोहोचेल.

२०७० पर्यंत पाकिस्तान सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश

२०२० ते २०२५ दरम्यान मुस्लिम मातांनी २५.२ कोटी बालकांना जन्म दिला, तर ख्रिश्चन मातांनी २०.८ कोटी बालकांना जन्म दिला. सध्या इंडोनेशियात जगातील सर्वाधिक मुस्लिम राहतात; परंतु सध्याचा कल कायम राहिल्यास २०७० पर्यंत पाकिस्तान सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्येचा देश बनेल. त्यापाठोपाठ भारत, नायजेरिया आणि इंडोनेशियाचा क्रमांक असेल.

आंतरधर्मीय संवादाची गरज

या आकडेवारीचा अर्थ 'ख्रिश्चन धर्माचा पराभव आणि इस्लामचा विजय' असा काढून समाजात तेढ निर्माण केली जाऊ नये, अशी चिंता 'प्यू'चे संशोधन संचालक ॲलन कूपरमन यांनी व्यक्त केली आहे. तर, हार्वर्ड डिव्हिनिटी स्कूलच्या संशोधक गिना झुर्लो यांच्या मते, या बदलत्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांमध्ये परस्पर संवाद आणि आंतरधर्मीय सामंजस्य वाढवणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT