US Iran conflict
वॉशिंग्टन : इराणने शांतता करार मान्य केला नाही, तर पुन्हा एकदा युद्ध सुरू होऊ शकते. इराणकडे तडजोड करण्याची संधी आहे, परंतु जर त्यांनी ती फेटाळली तर अमेरिका पुन्हा लष्करी कारवाई सुरू करेल. अमेरिकन फौजा पूर्णपणे तयार असून कोणत्याही क्षणी 'कॉम्बॅट ऑपरेशन' (लष्करी मोहीम) सुरू करू शकतात. अमेरिकन सैन्य राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट पाहत असून, निर्देश मिळताच कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा अमेरिकेच्या पेंटागॉनचे प्रमुख पीट हेगसेथ यांनी दिला आहे.
हेगसेथ यांनी म्हटले आहे की, अमेरिका इराणवरील नौदल नाकेबंदी सुरूच ठेवेल. अमेरिका आपले धोरणात्मक उद्दिष्ट साध्य करत नाही, तोपर्यंत ही कारवाई सुरू राहील असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकन जनरल डॅन केन यांनी सांगितले की, आतापर्यंत नाकेबंदीमुळे १३ जहाजे परतली आहेत. यापैकी बहुतांश जहाजे नाकेबंदीच्या सीमेच्या आत पोहोचल्यानंतर परतली, तर एका जहाजाने आधीच आपला मार्ग बदलला.
२१ एप्रिल रोजी संपणाऱ्या शस्त्रसंधीपूर्वी (Ceasefire) अमेरिका आणि इराण कराराच्या जवळ पोहोचत आहेत. अमेरिकन मीडियानुसार, दोन्ही बाजूंमधील चर्चेत प्रगती झाली आहे, तरीही काही मुद्द्यांवर अद्याप मतभेद कायम आहेत.दरम्यान, तेहरानमध्ये इराणी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख अासिम मुनीर यांच्यात महत्त्वाची बैठक होणार आहे. मुनीर यांनी इराणमध्ये पोहोचून परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची भेट घेतली असून, ते अमेरिकेचा संदेश घेऊन गेल्याचे समजते. पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत.