अयातुल्ला अली खामेनेई : शिया जगातील सर्वात मोठा नेता, एका साध्या मौलवीपासून सुप्रीम लीडरपर्यंतचा प्रवास file photo
आंतरराष्ट्रीय

अयातुल्ला अली खामेनेई : शिया जगातील सर्वात मोठा नेता, एका साध्या मौलवीपासून सुप्रीम लीडरपर्यंतचा प्रवास

खामेनेई यांनी तब्बल 36 वर्षे इराणची सत्ता सांभाळली.

पुढारी वृत्तसेवा

iran supreme leader ayatollah ali khamenei death irgc israel us attack

पुढारी ऑनलाईन

इस्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. खामेनेई यांनी तब्बल 36 वर्षे इराणची सत्ता सांभाळली. सुप्रीम लीडर होण्यापूर्वी ते देशाचे राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षणमंत्रीही होते. एका सामान्य मौलवीपासून सर्वोच्च नेते बनण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.

खामेनेई यांचा जन्म 19 एप्रिल 1939 रोजी इराणमधील मशहद येथे झाला. ते एका साध्या मौलवी कुटुंबातून आले होते. अतिशय लहान वयातच त्यांनी धार्मिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढील शिक्षणासाठी 1950 च्या दशकात ते कुम येथे गेले आणि अवघ्या 11व्या वर्षी मौलवी झाले.

कुममध्ये खामेनेई यांची भेट इस्लामी क्रांतीचे जनक अयातुल्ला रुहुल्लाह खुमैनी यांच्याशी झाली. खुमैनी यांच्या विचारांनी खामेनेई यांच्या जीवनाला नवे वळण दिले आणि हळूहळू ते त्यांच्या सर्वात विश्वासू शिष्यांपैकी एक बनले.

खामेनेई यांच्यावर बॉम्बहल्ल्याचा प्रयत्न

1960 च्या दशकात इराणच्या शाह (राजा) विरोधातील आंदोलनांमध्ये खामेनेई सक्रियपणे सहभागी झाले. शाहच्या पोलिसांनी त्यांना सहा वेळा अटक केली आणि तुरुंगात टाकले. 1979 मध्ये इस्लामी क्रांती यशस्वी झाल्यानंतर खामेनेई नव्या सरकारचे एक मजबूत स्तंभ म्हणून पुढे आले.

1981 मध्ये एका पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्यावर बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा उजवा हात कायमस्वरूपी निकामी झाला.

यानंतर खामेनेई यांची इराणचे उप-संरक्षणमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ची स्थापना केली. आज IRGC ही इराणमधील सर्वात शक्तिशाली लष्करी शक्ती मानली जाते.

सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती

1989 मध्ये अयातुल्ला रुहुल्लाह खुमैनी यांचे निधन झाले. त्यानंतर अली खामेनेई यांची इराणचे नवे सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या कारकिर्दीत इराणने आपला अणु कार्यक्रम वेगाने पुढे नेला. यामुळे अमेरिका आणि इस्रायलसोबतचे संबंध अधिकच तणावपूर्ण आणि शत्रुत्वाचे झाले. खामेनेई यांची ओळख एक कठोर आणि कट्टर विचारसरणीचे नेते अशी होती.

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणचे भविष्य काय?

खामेनेई यांच्या निधनानंतर आता सर्वात मोठा प्रश्न उत्तराधिकाऱ्याचा आहे. इराणने लवकरच नव्या सुप्रीम लीडरची घोषणा केली जाईल, असे संकेत दिले आहेत. संभाव्य उत्तराधिकारी म्हणून खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई आणि इराणचे संस्थापक अयातुल्ला खुमैनी यांचे नातू हसन खुमैनी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, नव्या सुप्रीम लीडरची निवड विशेषज्ञांची परिषद करणार असून, या प्रक्रियेत IRGC ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT