Iran drone retaliation after Israeli airstrikes Khamenei warning to Israel
तेहरान / जेरुसलेम : इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना उत्तर देताना इराणने शुक्रवारी रात्री सुमारे 100 ड्रोनद्वारे हल्ला चढवला. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खाेमेनी यांनी दिलेल्या कडक इशाऱ्यानंतर इराणकडून मोठा प्रतिहल्ला झाला.
इस्रायलने 200 फायटर जेट्सच्या साह्याने इराणमधील 100 हून अधिक ठिकाणी हल्ले केले. यात इराणचे लष्करी प्रमुख मोहम्मद बाघेरी, अणुशास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी तेहरांची आणि फरेदून अब्बासी, तसेच रिव्होल्युशनरी गार्ड्स कमांडर गोलाम अली राशिद यांचा मृत्यू झाला.
इराणचे सर्वोच्च नेते खाेमेनी यांनी इजरायलच्या कारवाईवर संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले की, "या गुन्ह्यासाठी झायनिस्ट (इजरायली) शासनाला एक कडवट आणि वेदनादायक शिक्षेस सामोरे जावे लागेल. इस्रायलने आमच्या देशावर अत्याचार केला असून, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील."
इराणच्या सशस्त्र दलांनी म्हटले आहे की, "अल-कुद्स (जेरुसलेम) व्यापणाऱ्या दहशतवादी शासनाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढे आमच्या कारवाईवर कोणतीही मर्यादा उरलेली नाही."
जनरल स्टाफ प्रवक्ते अबोलफजल शेकर्ची यांनी देखील स्पष्ट केले की, "इस्रायलला या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल."
इजरायलने इराणवर आरोप केला की तो "point of no return" म्हणजेच आण्विक शस्त्रनिर्मितीच्या अंतिम टप्प्यावर पोहोचत आहे.
"इराण मोठ्या प्रमाणात समृद्ध युरेनियम साठवून लपविलेल्या अंडरग्राउंड फॅसिलिटीजमध्ये लष्करी दर्जाच्या पातळीवर युरेनियमची निर्मिती करू शकतो," असे इस्रायली लष्कराने सांगितले.
इराणने उत्तर दिले की, "आता जगाला आमच्या अणु व क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या गरजेचे महत्त्व अधिक समजले आहे. इस्रायली हिंसाचाराचे उत्तर केवळ सामर्थ्यानेच देता येते."
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "युएन चार्टरच्या अनुच्छेद 51 नुसार आमच्याकडे बचावात्मक कारवाई करण्याचा कायदेशीर अधिकार आहे."
इराणने आरोप केला की इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये अमेरिका सहभागी आहे. अमेरिकेच्या संमतीशिवाय इस्रायलने असा हल्ला करण्याचे धाडस केले नसते," असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.
या संघर्षामुळे संपूर्ण मध्यपुर्वेत आखाती क्षेत्रात भीतीचे वातावरण पसरले असून, खनिज तेलाच्या किंमतीत तब्बल 12 टक्के वाढ झाली आहे. 2023 मध्ये चीनच्या मध्यस्थीने इराण-सौदी संबंध पूर्ववत झाले होते, मात्र सध्याचा संघर्ष पुन्हा एकदा मध्यपूर्वेत अस्थैर्य निर्माण करू शकतो.