

Global Gender Gap Index 2025 India rank on 131
नवी दिल्ली: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने गुरुवारी जाहीर केलेल्या ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट 2025 नुसार या क्रमवारीत भारत 148 देशांच्या यादीत 131 व्या स्थानावर घसरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत भारताची दोन स्थानांनी घसरण झाली आहे.
2024 मध्ये भारत 129 व्या स्थानावर होता. लिंग समानतेचा पारदर्शक स्कोअर (Gender Parity Score) फक्त 64.1 टक्के असून, दक्षिण आशियातील सर्वांत खालच्या रँकिंगमध्ये असलेल्या देशांपैकी एक भारत आहे.
आर्थिक सहभाग- यात भारताने +0.9 टक्क्यांची वाढ नोंदवली असून एकूण स्कोअर 40.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. मजुरीमध्ये समानता काहीशी सुधारली असून, महिलांचे अंदाजित उत्पन्न 28.6 टक्क्यांवरून 29.9 टक्के झाले आहे. मात्र, कामगार शक्ती सहभाग दर (Labour Force Participation Rate) मात्र मागील वर्षासारखाच 45.9 टक्के आहे. जो आतापर्यंतचा सर्वोच्च आहे.
शैक्षणिक क्षेत्रात उजळ बाजू- शैक्षणिक उपलब्धीमध्ये भारताने 97.1 टक्के स्कोअर मिळवला आहे. महिलांची साक्षरता आणि उच्च शिक्षणात सहभाग वाढल्याने ही प्रगती झाली आहे.
आरोग्यात सुधारणा- भारताने लैंगिक गुणोत्तर (sex ratio at birth) आणि आरोग्यदायी आयुष्य कालावधी (healthy life expectancy) यामध्ये सुधारणा दाखवली आहे. तथापि, एकूण आयुष्यकालावधी पुरुष व महिलांसाठी कमी झाला आहे.
राजकीय सक्षमीकरणात घसरण- राजकीय सक्षमीकरणात भारताला फटका बसला आहे. संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 14.7 टक्क्यांवरून 13.8 टक्क्यांवर घसरले आहे. मंत्रीपदांमध्ये महिलांचा वाटा 6.5 टक्क्यांवरून 5.6 टक्के झाला असून, हा घटक 2019 मधील 30 टक्क्यांच्या सर्वोच्च स्तरापासून खूप दूर आहे.
दक्षिण आशियातील देशांमध्ये भारताची रँकिंग चिंताजनक आहे-
बांगलादेश: 24वे स्थान (75 स्थानांची झपाट्याने प्रगती, राजकीय सक्षमीकरणात मोठी कामगिरी)
भूतान: 119
नेपाळ: 125
श्रीलंका: 130
भारत: 131
मालदीव: 138
पाकिस्तान: 148 (तळाच्या स्थानी)
आईसलँड (16व्या वर्षी सलग अव्वल)
फिनलंड
नॉर्वे
युनायटेड किंगडम
न्यूझीलंड
अहवालानुसार, जागतिक स्तरावर लिंग समानता आता 68.8 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे, आणि ही कोविड-19 महारोगराईनंतरची आतापर्यंतची सर्वात मोठी प्रगती मानली जाते.
तथापि, सध्याच्या प्रगतीच्या गतीने चालत राहिल्यास संपूर्ण लिंग समानता साध्य होण्यासाठी अजूनही 123 वर्षे लागतील, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, जागतिक महिला कार्यबलात महिलांचा सहभाग 41.2 टक्के असला तरी, नेतृत्वाच्या भूमिका फक्त 28.8 टक्के महिलांकडे आहेत.